IND vs SL 1st Test : मोहालीत आजपासून ऐतिहासिक कसोटी | पुढारी

IND vs SL 1st Test : मोहालीत आजपासून ऐतिहासिक कसोटी

मोहाली ; वृत्तसंस्था : भारत आणि श्रीलंका (IND vs SL 1st Test) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 4 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना मोहालीत होणार आहे. ही कसोटी भारतासाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची ही 100 वी कसोटी असणार आहे. तर रोहित शर्मा पूर्णवेळ कसोटी कर्णधार झाल्यानंतर ही त्याची पहिलीच कसोटी असणार आहे. भारताने जर मोहाली कसोटीत श्रीलंकेला पराभूत केले तर विशेष रेकॉर्ड होणार आहे.

श्रीलंका भारताबरोबर 1982 पासून कसोटी मालिका खेळत आहे. मात्र, त्यांना या 40 वर्षांत एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत भारतात 20 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील 11 कसोटी भारताने जिंकल्या आहेत तर 9 कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. श्रीलंका आणि भारत यांच्यात एकूण 44 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील 20 भारताने तर 7 श्रीलंकेने जिंकले आहेत तर 17 कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. भारताने जर मोहाली कसोटी जिंकली तर श्रीलंकेविरुद्ध 21 कसोटी विजय साजरा करणारा भारत पहिला संघ होईल.

भारत – श्रीलंका कसोटी (IND vs SL 1st Test) सामन्यातील काही खास रेकॉर्डस्

* 1997 मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात 6 बाद 952 धावा ठोकल्या होत्या. या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावा आहेत.

* 1990 मध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 82 धावांवर ऑल आऊट झाला होता. दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील ही नीचांकी धावसंख्या होती.

* भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने श्रीलंकेविरुद्ध 1995 कसोटी धावा केल्या आहेत.

* भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या सामन्यात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. त्याने एका डावात 340 धावा केल्या होत्या.

* श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने लंकेविरुद्ध 9 शतके ठोकली आहेत.

* भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेटस् या मुथय्या मुरलीधरनने घेतल्या आहेत. त्याने भारताविरुद्ध 105 विकेटस् घेतल्या आहेत.

पहिला कसोटी सामना
स्थळ : पीसीए स्टेडियम मोहाली
वेळ : सकाळी 9.30 पासून
प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क

Back to top button