Virat Kohli : कर्णधारपद सोडल्‍यानंतर विराट म्‍हणाला, माझा मुकाबला ‘या’ खेळाडूशी | पुढारी

Virat Kohli : कर्णधारपद सोडल्‍यानंतर विराट म्‍हणाला, माझा मुकाबला 'या' खेळाडूशी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) आता आपली नवी इनिंग खेळण्‍यासाठी सज्‍ज झाला आहे. याची घोषणाच त्‍याने एक फोटो शेअर करत सोशल मीडियावर दिली आहे. या फाेटाेमधून त्‍याने स्‍पष्‍ट केली आहे की, त्‍याचा प्रतिस्‍पर्धी कोण आहे ते. दक्षिण आफ्रिकेमधील कसोटी मालिका पराभूत झाल्‍यानंतर विराट कोहली याने कसोटी कर्णधारपदही सोडले होते. यानंतर त्‍याने प्रथमच एक फोटो शेअर करत आपली पुढील वाटचाल स्‍पष्‍ट केली आहे.

तुमचा मुकाबला हा नेहमी स्‍वत:शी असतो…

दक्षिण आफ्रिकेमध्‍ये कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे मालिकेतही टीम इंडियाला नामुष्‍कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारतीय संघ वेस्‍ट इंडिज संघा विरुद्‍ध वन डे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराटवर कर्णधारपदाचा दबाव असणार नाही. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा त्‍याचा ‘विराट’ फॉर्म पाहण्‍याची संधी चाहत्‍यांना सणार आहे. आता सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत विराटने आपली पुढील वाटचाल स्‍पष्‍ट केली आहे. या फोटोमध्‍ये त्‍याचा आक्रमकता स्‍पष्‍ट दिसत आहे. या फोटोला दिलेल्‍या कॅप्‍शनमध्‍ये विराटने स्‍पष्‍ट केले आहे की, तुमचा मुकाबला हा नेहमी स्‍वत:शी असतो.

Virat Kohli : विराट आहे भारताचा सर्वात यशस्‍वी कसोटी कर्णधार

विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्‍वी कर्णधारांपैकी एक आहे. तसेच कसोटी फॉर्मटमधील तो सर्वात यशस्‍वी कर्णधार ठरला आहे. त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संघाने एकुण ६८ कसोटी सामने खेळले. यातील ४० सामन्‍यांमध्‍ये भारतीय संघ विजयी ठरला. ऑस्‍ट्रेलियामध्‍ये मालिका जिंकण्‍याचा पराक्रमही विराटच्‍या नावावर आहे. अशी कामगिरी करणारा तो आशियातील एकमेव कर्णधार ठरला आहे. इंग्‍लंडमध्‍येही त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने उत्‍कृष्‍ट कामगिरी केली. विदेशाबरोबर भारतातही त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संघाचा केवळ दोन सामन्‍यांमध्‍ये पराभूत झाला आहे. वन डे सामन्‍यांचा विचार करता विराटच्‍या नेतृत्‍वाखाली भारताने एकुण ९५ वनडे सामने खेळले. यामधील ६५ सामन्‍यांमध्‍ये विजय नोंदवला आहे. वनडे सामन्‍यांमधील त्‍याची विजयाची टक्‍केवारी ही महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुलीपेक्षाही चांगली आहे.

Virat Kohli : मागील दोन वर्ष शतकी खेळीची प्रतीक्षा

११ वर्षांच्‍या कारकीर्दीत विराट कोहलीच्‍या नावावर  ७० हून अधिक शतकी खेळीची नाेंद आहे. मात्र मागील दोन वर्ष तो शतकी खेळीच्‍या प्रतिक्षेत आहे. असे नाही की, त्‍याचा फॉर्म खराब आहे; त्‍याने अर्धशतकी खेळी खूपवेळा केली आहे. त्‍याची धावांची सरासरीही उत्‍कृष्‍ट आहे. अनेक सामन्‍यांमध्‍ये त्‍याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र चांगल्‍या खेळीची सुरुवात झाल्‍यानंतर तो चुकीच्‍या फटक्‍यांमुळे बाद झाला आहे. यामुळेच मागील दोन वर्ष तो शतकी खेळीपासून वंचित राहिला आहे.  मागील तीन महिन्‍यांमध्‍ये क्रिकेटमधील तिन्‍ही फॉर्मेटचे कर्णधारपद त्‍याने सोडले आहे. आता त्‍याच्‍या चाहत्‍यांना अपेक्षा आहे की , विराटने आपले सर्व लक्ष हे फलंदाजीवर केंद्रीत करावे. पुन्‍हा एकदा टीम इंडियाला विजय मिळवून देणारी खेळी करण्‍यास सुरुवात करावी. आत वेस्‍ट इंडिजविरुद्‍धच्‍या सामन्‍यात चाहत्‍यांचे लक्ष ‘विराट’ खेळीकडे असेल.

हेही वाचलं का?

 

Back to top button