ICC ODI Ranking : विराट कोहली रोहित शर्माच्या पुढेच! | पुढारी

ICC ODI Ranking : विराट कोहली रोहित शर्माच्या पुढेच!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी (ICC ODI Ranking)ने नवी वनडे क्रमवारीची जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली (rohit sharma) आणि रोहित शर्मा (virat kohli) टॉप-१० मध्ये कायम आहेत. विराट दुसऱ्या तर रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह गोलंदाजांमध्ये सातव्या तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे. रोहित आणि जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळले नव्हते. या दोघांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. भारताच्या कोणत्याही खेळाडूने द. आफ्रिकेविरुद्ध खास अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे आयसीसी क्रमवारीतही कोणत्याही खेळाडूला फायदा झालेला नाही.

दुसरीकडे, भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे. क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी फलंदाजांच्या टॉप १० क्रमवारीत एन्ट्री केली आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर प्रथमच डी कॉकने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तर, डुसेनने कारकिर्दीत प्रथमच टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. (ICC ODI Ranking)

डीकॉकला चार स्थानांचा फायदा

डी कॉकने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण २२९ धावा केल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार १२९ धावांची खेळी केली. चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला आयसीसी क्रमवारीत चार स्थानांचा फायदा झाला. तर २१८ धावा करणाऱ्या डुसेनने १० स्थानांची प्रगती करत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कर्णधार टेंबा बावुमानेही ८० व्या स्थानावरून कारकिर्दीतील ५९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. (ICC ODI Ranking)

शिखर धवन १५ व्या स्थानावर…

भारताचा सलामीवीर शिखर धवनने द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात सर्वाधिक १६९ धावा केल्या. धवन फलंदाजांच्या क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो ८२ व्या स्थानावर आहे. या यादीत बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाहने नेदरलँड्सविरुद्ध एकूण १५३ धावा केल्या. त्याला सात स्थानांचा फायदा झाला असून तो ३६ व्या स्थानावर पोहचला आहे. तर हशमतुल्ला शाहिदीला नऊ स्थानांचा फायदा झाला असून तो ५३ व्या स्थानी गेला आहे. (ICC ODI Ranking)

नेदरलँड्सच्या स्कॉट एडवर्ड्सने २०८ धावांची खेळी केली होती. त्याने ९७ स्थानांची झेप घेत १०० वे स्थान स्थान पटकावले आहे. श्रीलंकेचा चरित अस्लंका ५२ व्या स्थानावरून ४६ व्या स्थानावर पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही फायदा…

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही खूप फायदा झाला आहे. मालिकेत पाच विकेट घेणारा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी पुन्हा टॉप-२० मध्ये परतला आहे. तर फिरकी गोलंदाज केशव महाराज कारकिर्दीतील सर्वोत्तम ३३ व्या स्थानावर आहे. अँडिले फेहलुकवायो मालिकेत सहा विकेट्स घेत सात स्थानांनी वर ५२ व्या स्थानावर आहे.

जेसन रॉय आणि ब्रेडन किंग यांना टी-२० मध्ये फायदा…

ICC T20 फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ४५ धावा केल्या. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा ब्रँडन किंग त्याच्या नाबाद ५२ धावांमुळे ८८ व्या स्थानावर गेला आहे. गोलंदाजांच्या यादीत जेसन होल्डर कारकिर्दीतील सर्वोत्तम २६ व्या स्थानावर आहे. त्याचा सहकारी गोलंदाज अकिल हुसेनने ४० व्या स्थानावरून ३३ व्या स्थानावर पोहोचला.

Back to top button