पश्चिम घाट : निसर्गाची ऑक्सिजन बँक | पुढारी

पश्चिम घाट : निसर्गाची ऑक्सिजन बँक

पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

निसर्गाचे महत्त्व हे सर्वज्ञात आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही ठराविक विभाग व त्या ठिकाणच्या जनतेचीच, अशा अविर्भावात असलेल्या मंडळींना कोरोनाने ऑक्सिजन तथा प्राणवायूची किंमत दाखवून दिली. यापूर्वी बाटलीतील पाणी ही संकल्पना स्वप्नवत वाटत होती, तीच आता प्राथमिक गरज बनली आहे. भविष्यात विकतचा ऑक्सिजन पाठीवर घेऊन फिरायची वेळही आली आहे. यासाठी निसर्ग रक्षण, संवर्धन यासाठी सार्वत्रिक प्रयत्न अत्यावश्यक बनले आहेत. 

प्रामुख्याने सातारा जिल्हा हा पर्यावरणाचा तारणहार ठरताना येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र व पश्चिम घाट प्रकल्प, इको-सेन्सिटिव्ह झोन आदीसह हजारो हेक्टर क्षेत्रातील जंगले, वनसंपदेतून मिळणारा ऑक्सिजन आता लाखमोलाचा ठरत आहे.

पर्यावरण रक्षणात कोकणातील काही जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली याहीपेक्षा सातारा जिल्ह्याचे विशेष योगदान आहे. या जिल्ह्यातील पश्चिम घाट प्रकल्पातील वाई तालुक्यातील मांढरदेवपासून महाबळेश्वर, प्रतापगड, वासोटा, पाली किल्ला, जंगली जयगड ते भैरवगड असा जवळपास 125  किलोमीटरचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. पश्चिम घाटाच्या याच प्रदेशात मोठे जंगल, उंच

डोंगरदर्‍या, कपारीमुळे कोकणातून येणारा नैऋत्य मोसमी पाऊस येथील उंच डोंगर,  सह्याद्रीच्या पर्वतरांगा अडवतात. भारतातील पावसाचे प्रमुख खोरे म्हणूनही याची ओळख आहे. कृष्णा खोर्‍याचा उगमही येथून म्हणजेच श्री क्षेत्र महाबळेश्वर येथून झाला. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री या नद्यांचा उगम येथे आहे. सोबतच उरमोडी, तारळी, कुडाळी, उत्तर दक्षिणमांड, मोरणा, केरा, कापना यासारख्या बहुतांशी नद्या व त्यापैकी अनेक नद्यांवर बांधलेली छोटी-मोठी धरणे यामुळे या जिल्ह्याला ‘वॉटर बाऊल’ म्हणूनही संबोधले जाते. शेतीसह पिण्याचे पाणी व वीजनिर्मितीही यातूनच केली जाते.

युनायटेड नेशन (यूएन) या जागतिक संस्थेने पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य, कास पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान यांना ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून दर्जाही बहाल केल्याने जंगलांनाही संरक्षण प्राप्त झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कोयना अभयारण्यातील वन्यप्राणी, पशू, पक्षी, औषधी आणि दुर्मीळ वनस्पतींचे संरक्षण व संवर्धनही होत आहे. पश्चिम घाट क्षेत्रात खासगी मालक जमिनींचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर आहे. हेच क्षेत्र अलीकडच्या काळात पर्यावरण रक्षणात कमी पडत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस त्यामुळे खासगी क्षेत्रात भलेही मोठ्या प्रमाणावर झाडी असली, तरी त्याची किती तरी पटीने होणारी वृक्षतोड धोकादायक ठरत आहे. यातूनच डोंगरच्या डोंगर ओसाड पडल्याने मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होत आहे. यातून स्थानिक धरणांत त्याच पटीत कमालीचा गाळ वाढत चालला आहे. यापुढे पर्यावरण रक्षण होण्यासाठी शाश्वत विकासाच्या संकल्पना राबविणे सार्वत्रिक हिताचे ठरण्यासाठी स्थानिकांचा यात सहभाग महत्त्वाचा आहे. गावातील खासगी क्षेत्रातील जंगले राखण्यासाठी स्थानिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक लाभ, अनुदान दिल्यास ही जंगले सुरक्षित होऊन पर्यावरण रक्षण होईल.

पर्यावरण रक्षणात अग्रस्थानी असलेल्या सातारा जिल्ह्याने आजवर पाणी, वीज देताना अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून प्रदूषणविरहित पवनऊर्जाही दिली. आपल्या पोराबाळांप्रमाणे जंगले, वन्यजीव सांभाळले आणि इतरांच्या जीवनातील श्वास ठरत फुकटचा ऑक्सिजनही भरभरून दिला व यापुढेही तो देतच राहणार आहे. कोरोनामुळे एक सेकंद श्वास तथा ऑक्सिजनची सगळ्या जगाला किंमत समजली. त्यामुळे आता केवळ निसर्ग पूजा, कोट्यवधी वृक्षलागवडींचे शासकीय कागदोपत्री व औपचारिक घाट घालण्यापेक्षा प्रत्यक्षातील कृतीच आपला व आपल्याच भावी पिढ्यांचा श्वास आश्वस्त करू शकते. 

पर्यावरण रक्षण एक सामाजिक चळवळ बनली, तरच आपला भविष्यकाळ शारीरिकद़ृष्ट्या सुद़ृढ जाईल. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा विचार सतत कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी

निसर्गातील एक झाड वर्षाकाठी 120 ते 150 किलो ऑक्सिजन तयार करते. एक किलोमीटर क्षेत्रातील जंगल वर्षाकाठी सरासरी 250 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे यापुढे बहुसंख्येने वृक्षलागवड आणि त्याचपटीत त्याचे संवर्धन केले, तरच आपल्याला वाढत्या प्रदूषणावर मात करता येणार आहे.

Back to top button