माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ‘अतिथी देवो भव:’ | पुढारी

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ‘अतिथी देवो भव:’

आमच्या लोणंद गावात श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींची पालखी आल्यावर हार घालून पुष्पवृष्टी करून स्वागत करतो. पालखी ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी पंचपदी आरती करतो. तसेच आलेल्या वारकर्‍यांचे घरी माऊलीच आलेत, पांडुरंग, भगवान परमात्मा आलेत, असे समजूनच त्यांची सेवा करतो. त्यांच्यासाठी उत्कृष्ट भोजन करतो. तसेच वस्त्रदान तसेच वारकर्‍यांची डॉक्टरांकडून सर्व शरीराचे चेकअप करून गोळ्या-औषध देतो. हे सर्व काही मोफत. अगदी दिलखुलासपणे अशी सेवा करतो. 

पालखीचा मुक्काम संपल्यावर पुढच्या गावी पालखी रवाना करण्यासाठी पुन्हा सरहद्दीवर पंचपदी आरती करून पुढील गावच्या गावकर्‍यांच्या स्वाधीन करताना तेथेही पुन्हा पंचपदी आरती करून समाधानाने माघारी फिरतो. वारकर्‍यांची सेवा करताना आम्ही जशी आमच्या आई-वडिलांची सेवा करतो, तशी भगवान पांडुरंगाची सेवा करीत आहे, अशी भावना ठेवून सेवा करीत असतो.   माऊली पांडुरंग भगवंतच घरी आहेत असे वाटते. ‘अतिथी देवो भव:’ म्हणजे अतिथी हे देवच आहेत असे आम्ही समजतो. 

वारीला निरोप देताना जसे आपल्या जिव्हाळ्याचे माणूस आपल्या घरून जेव्हा आपल्या स्वगृही जायला निघते, किंवा आपली मुलगी सणासुदीला येते आणि सण झाल्यावर सासरी जायला निघते, त्यावेळी आपल्या मनामध्ये जी भावना निर्माण होते तसेच ज्ञानेश्‍वर माऊलींची पालखी व वारकरी जाताना होते. कंठ दाटून येतो. आपुलकीचे माणूस सुखाच्या कार्यक्रमासाठी येते तसेच बहीण किंवा मुलगी सणासुदीला येत असते; परंतु काही कारणास्तव काही अडचणीस्तव ही मंडळी येऊ शकत नाही, त्यावेळी सुने सुने वाटते. तसे पालखी सोहळ्याची वारी कोरोना या आजारामुळे रद्द झाल्याने, न येण्याने मन हळहळते. 

यंदा वारी नसली तरी मनात भक्तिभाव असल्याने आम्ही घरीच भक्तिभावाने पांडुरंगाची मूर्ती तीर्थाचे पाणी ताम्हणात घेऊन पाण्याने स्नान घालून मग पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून पंचाने किंवा शुभ्र वस्त्राने पुसून मग ती मूर्ती देव्हार्‍यात किंवा चौरंगावर ठेवून विठ्ठल नामाचा जप करत करत फुले, तुळशीपत्र, अष्टगंध, गोपीचंद लावून गोड नैवेद्य दाखवतो. अशी यथासांग पूजा करतो. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आल्यावर निरा नदीवर दत्त घाटावर दत्त मंदिरासमोर निरा नदीत ज्ञानेश्‍वर माऊलींचे स्नान पूजाविधी आरती आणि मग लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, बरड, माळशिरस, वेळापूर, बंडीशेगाव, वाखरी, आणि मग या  पंढरपुरामध्ये चारी दिशांकडून हा वारकरी समाज पंढरपुरात एकत्र होतो.

आमचे महाराज पदरचे पैसे देऊन वारी पूर्ण करण्यास मदत करतात. आणि वारीकरिता काय हवं, नको ते मागा, आमच्याकडे सर्व काही आहे असेही सांगणारी मंडळीही आमच्यात आहेत. पंढरपुरापर्यंत काही लोक गाडीत परत येताना म्हणतात, देव पायी पायी येतात आणि देव पायी पायी आपल्या स्थळी जातात. त्यावेळी सर्व वैष्णव काही वारकरी जे आहेत आणायला येतात, सोडायला येतात, काही वारकरी लोकांना काही कारणास्त्व ते जमत नाही. एकच वारी नाही, अशा अनंत वार्‍या आहेत त्यापैकी कोणत्याही वार्‍या करता येतात. 

माझ्या वडिलांची मिराशी गा देवा 

तुझी चरण सेवा पांडुरंगा 

उपवास करणी राखीलो दारवंता 

केला भोगवटा आम्हालागी 

माझ्या वडिलांची मिराशी गा देवा 

तुझी चरण सेवा पांडुरंगा

– सत्त्वशील शेळके-पाटील, अध्यक्ष, श्री विठ्ठल भक्‍त खंडाळा 

तालुका वारकरी मंडळ

Back to top button