

Rashmika Mandanna Break Virat Kohli Instagram Record: दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. आंध्रा आणि कोडवा परंपरेनुसार पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. लग्नानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
रश्मिकाने लग्नाचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि अवघ्या एका दिवसात त्या पोस्टला 23 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले. विशेष म्हणजे हा आकडा भारतातील सर्वाधिक लाइक्स मिळालेल्या पोस्टपैकी एक आहे. यामुळे भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या एका जुन्या रेकॉर्डलाही मागे टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विराट कोहलीने 2024 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्या पोस्टला सुमारे 22 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले होते आणि ती भारतातील सर्वाधिक लाइक्स मिळालेली पोस्ट होती. विराट हा इन्स्टाग्रामवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू असून त्याचे 274 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याचा हा विक्रम मोडला गेल्याची चर्चा आहे.
रश्मिका आणि विजय यांच्या लग्नातील पोशाख, दागिने आणि पारंपरिक लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विशेषतः रश्मिकाच्या सोन्याच्या दागिन्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, तर काही विराटचे चाहते त्यांच्या पोस्टवर अधिकाधिक लाइक्स करण्याचे आवाहन करताना दिसले.
या घटनेनंतर सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया प्रभावाबाबत चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी या दोन्ही क्षेत्रांतील स्टार्सची लोकप्रियता प्रचंड आहे. मात्र लग्नासारख्या खासगी क्षणांनाही सोशल मीडियावर विक्रमी प्रतिसाद मिळू शकतो, हे रश्मिकाच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
आजच्या डिजिटल युगात लाइक्स आणि फॉलोअर्स हे लोकप्रियतेचे महत्त्वाचे मापदंड मानले जातात. एका पोस्टमुळे विक्रम मोडणे आणि नवे रेकॉर्ड होणे हे आता सामान्य झाले आहे. रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या पोस्टने सोशल मीडियावर नवा ट्रेंड् तयार झाला आहे. सध्या तरी रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.