पत्नीच्या छळाच्या आरोपावर अभिनेता अनिकेत विश्वासराव म्हणाला... | पुढारी

पत्नीच्या छळाच्या आरोपावर अभिनेता अनिकेत विश्वासराव म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क

दोन दिवसांपूर्वी मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात त्याच्या पत्नीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त येऊन धडकले होते. त्याची पत्नी स्नेहा चव्हाण हिने अभिनेता अनिकेत विरोधात छळ प्रकरणी तक्रार दाखल केली. पण, आता या प्रकारानंतर विश्वासरावने प्रतिक्रिया दिलीय. आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे त्याने म्हटले आहे.

विश्वासरावसोबत ‘पुढारी ऑनलाईन’ने संपर्क साधला असता त्याने हे स्पष्टीकरण दिलंय. मी माझ्या बायकोला मारझोड करतो अशी जी काही तक्रार दिली आहे हे साफ खोटे आहे असे त्याने म्हटले आहे.

तसेच हे खरंय की मी आणि माझी बायको गेले अनेक महिने एकत्र राहत नाही. ती पुण्यात असते. मी मुंबईमध्ये राहतो. घटस्फोट अजून आम्ही घेतलेला नाहीये. त्याबद्दल मी आता काही सांगू शकत नाही. ते ही आता पुढे कळेलच, असे तो म्हणाला. तिथे माझ्या विरोधात तिने काय केलंय याची काहीच कल्पना नाही. असे का केले जातेय हे ही कळत नाही, असंही विश्वासराव म्हणाला. मला अजून तरी पोलिस ठाण्यातून कोणता ही कॉल आलेला नाहीये त्यामुळे मी आता काही सांगू शकत नाही, असेही त्याने स्पष्ट केलं.

प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा २०१८ मध्ये विवाह मोठ्या धामधुमीत झाला. स्नेहा चव्हाणही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलंय. अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरिक छळ केलाय, अशी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचं तिने फिर्यादीत म्हटलं आहे. अनिकेत याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

तिने फिर्यादित म्हटलं की, अनैतिक संबंध तसेच करिअरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल. या भीतीने मला जीवे मारण्याची धमकी  देण्‍यात आली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हाताने मारहाण करण्यात आली. लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ करण्यात आला.

Back to top button