तीन कृषी कायदे रद्द : माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया | पुढारी

तीन कृषी कायदे रद्द : माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

चंद्रपूर : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर केंद्रात १० वर्षे कृषिमंत्री म्हणून राहिलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे संपूर्ण शेतकरी अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणारे होते. तरीही राज्य सरकारांशी चर्चा न करताच केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले आणि ते काही तासांतच मंजूर करून घेतले. या आंदोलनाला विरोध म्हणून वर्षभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्या शेतकरी वर्गाला माझा सलाम, असे शरद पवार यांनी चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे (farm Laws) मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन कायम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे (farm Laws) मागे घेण्याची घोषणा केली.

यावर शरद पवार बोलताना म्हणाले की, मी केंद्रात १० वर्षे कृषिमंत्री होतो. कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला वाव मिळावा. शेतकऱ्याच्या शेतमालास जागतिक बाजारपेठ मिळावी हा विचार केंद्रात होत होता. पण आताच्या केंद्र सरकारने कोणीशी चर्चा न करताच कृषी कायदे आणले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक वर्षे शेतकरी ऊन-पावसाचा विचार न करता दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने चर्चेतून मार्ग काढण्याची गरज होती. पण सरकारने काही केले नाही.

पंजाब, हरियाणाच्या निवडणुका तोंडावर आहेत. या दरम्यान नेत्यांना शेतकरी विचारतील, त्याची किंमत चुकवावी लागेल. त्यासाठी हे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा दावा शरद पवार यांनी केला.

कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयामुळे शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय झाला असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी देशात तीन कृषी कायदे आणले होते. विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना अधिक बळ मिळावे. शेतमालास योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने कृषी कायदे आणले होते, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

हे ही वाचा :

 

Back to top button