कार्तिकी पौर्णिमा : पर्वती टेकडीवर कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा | पुढारी

कार्तिकी पौर्णिमा : पर्वती टेकडीवर कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

कार्तिकी पौर्णिमा निमित्त दरवर्षी पर्वती टेकडीवर भाविकांच्या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. यंदाही पर्वती टेकडीवर अशाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दीड वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दर्शनाचा मुहूर्त असल्याने पर्वती पायथ्यापासून टेकडीवरील स्वामींच्या मंदिरापर्यंत आज (शुक्रवार) कार्तिकी पौर्णिमा निमित्‍त भाविकांची गर्दी केली हाेती.

गुरुवारी रात्रीच भाविकांनी या ठिकाणी येऊन त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त शेकडो दिवे लावून दिपोत्सव साजरा केला. त्यानंतर भाविकांच्या दर्शन रांगांना सुरुवात झाली. पर्वतीच्या पायथ्यापासून टेकडीवरील कार्तिक स्वामींच्या मंदिरापर्यंत भाविकांच्या रात्रीपासूनच रांगा लागलेल्या आहेत. पेशवेकालीन असलेल्या या मंदिरात भाविकांची दरवर्षी गर्दी होत असते असे मंदिराचे व्यवस्थापक दिनेश कुमार पांडे यांनी सांगितले.

याबाबत देवस्थानचे विश्वस्त योगेश चव्हाण म्हणाले, कोरोनंतर शासनाने मंदिरे सुरू केली आहेत. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. यंदाचा दर्शनाचा मुहूर्त मोठा असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रात्रीपासूनच भाविकांची येथे गर्दी होत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.

कृतिका नक्षत्राबाबत माहिती देताना देवस्थानचे मुख्य पुजारी श्रीकर पांडव म्हणाले, कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मंदिरात कृतिका नक्षत्रावर दोन पूजांचे आयोजन केले जाते. पहिली पूजा कृतिका नक्षत्र सुरू होताना असते आणि दुसरी पूजा कृतिका नक्षत्र संपल्यावर असते. या दोन्ही पूजांना देवस्थानचे विश्वस्त उपस्थित असतात. ही पूजा केल्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाते.

पहा व्हिडिओ : मुंबईत मराठी आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला

Back to top button