खरं स्वातंत्र्य २०१४ पासूनच; विक्रम गोखले मतावर ठाम | पुढारी

खरं स्वातंत्र्य २०१४ पासूनच; विक्रम गोखले मतावर ठाम

मुंबई; पुढारी ऑनलाईन

देशाच्या स्वातंत्र्यावरून जे काही घमासान सुरू आहे, ते थांबायचं नाव घेत नाही. कंगना राणने देशाच्या स्वातंत्र्यावरून वक्तव्य केले. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, असे कंगना म्हणाली. त्यास अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन दिलं. पण, या प्रकारानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आता त्याचं विधानावर गोखले ठाम आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की- देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ पासूनचं मिळालंय. आणि या मतावर मी ठाम असून ते मत बदलणार नाही. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोखले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. अनेकांनी त्य़ांच्यावर आरोप करत टीकाही केली.

पण, आज सर्वांसमोर ते आपल्या मतावर ठाम राहिले. त्याचबरोबर ते म्हणाले- ‘२०१४ पासून देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे. मी त्यावर ठाम असून ते बदलणार नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मूळ भाषणात मी काय म्हणालो ते दाखवण्यात आलेलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.’ गोखलेंसोबत त्यांची मुलगी नेहा देखील पत्रकार परिषदेत होती.

काय म्हणाली होती कंगना?

‘१९४७ साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं, असं वक्तव्य कंगनाने एका कार्यक्रमात केलं होतं. तिला गोखलेंनी दुजोरा दिला होता. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. आरोपांच्या फैरीही त्यांच्यावर झाडण्यात आल्या.

मी कंगनाला ओळखतही नाही

गोखले म्हणाले- ‘कंगनाची मतं तिची वैयक्तिक आहेत. स्वातंत्र्याबद्दल तिनं व्यक्त केलेल्या मताला तिची वैयक्तिक कारणेही आहेत. तिचं समर्थन करताना माझी कारणेही वैयक्तिक आहेत. मी तिला ओळखतही नाही. मी केवळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिलाय. तो माझ्या अभ्यासाच्या आधारे दिला. १८ मे २०१४ च्या ‘गार्डियन’मध्ये जे लिहिलं गेलंय, तेच कंगना बोलली होती.

अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले

गोखले पुढे म्हणाले-मी तोंडफाटका माणूस आहे. मला ओठ शिवता येत नाहीत. त्यामुळेच माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. गेल्या ३० वर्षांत मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले. पण मी गेलो नाही.

आपल्या लाज वाटली नाही का?

कंगनाचे समर्थन केल्यानंतर ज्यांनी मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं वाटतंय. तर ते चुकीचं आहे. माझ्या मूळ भाषणात मी काय बोललो हे दाखवलं गेलं नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं कुणाला वाटत असेल तर ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल’ हे गीत म्हणताना, ज्यांची अवहेलना झाली त्यांचं काय? मग तेव्हा का आपल्याला लाज वाटली नाही? असा प्रश्नही गोखले यांनी उपस्थित केला.

Back to top button