धुळे : मोठा परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना गंडा, कंपनी विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : मोठा परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना गंडा, कंपनी विरोधात गुन्हा दाखल

धुळे ; पुढारी वृत्तसेवा

आकर्षक बक्षीस आणि मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कंपनीच्या संचालकांच्या विरोधात धुळ्यात गुन्हा दाखल झाला आहे. जनतेने खोट्या हमीला बळी पडून गुंतवणूक न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. ज्‍या गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. ज्‍यांची फसवणूक झाली आहे अशांनी  संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

ठेवीच्या मोबदल्यात मोठा परतावा आणि आकर्षक भेटवस्तूंचे आमिष

धुळ्याच्या देवपूर परिसरामध्ये इ फोर यू सेल्स आणि सर्व्हिस एलएलपी या नावाची कंपनी स्थापन करून तिचे कार्यालय थाटण्यात आले. या कंपनीच्या संचालकांनी संबंधित गुंतवणूकदारांना मोठ्या ठेवी ठेवण्याचे आवाहन केले. या ठेवीच्या मोबदल्यात मोठा परतावा आणि आकर्षक भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवल्याने अनेकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. मात्र ठेवी स्वीकारताना कंपनीने स्वीकारलेल्या पैशांच्या मोबदल्यात गुंतवणूकधारकांना कोणतीही पोच पावती आणि प्रमाणपत्र न देता कंपनीच्या ऑनलाइन लिंक वर या स्कीम बाबत माहिती ठेवली.

गुंतवणुकीची माहिती इंटरनेट सर्व्हरवरून डिलीट करून कंपनीचे रेकॉर्ड केले नष्ट

कंपनी सुरू असेपर्यंत या ऑनलाइन लिंक वर रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात आली. मात्र काही महिन्यांनंतर ही कंपनी बंद करण्यात आली. त्यानंतर कंपनीने एप्लीकेशन लींक तसेच सर्व स्कीम मधील गुंतवणुकीची माहिती ही इंटरनेट सर्व्हर वरून डिलीट करून कंपनीचे रेकॉर्ड नष्ट केले. तसेच मुदतीनंतर ही कोणत्याही प्रकारचा परतावा गुतवणूकधारकाना मिळत नसल्याचे पाहून काही गुंतवणूकदारांनी देवपूर पोलिसांशी संपर्क केला. त्यानुसार देवपूर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून जळगाव येथील कंपनीचे चेअरमन राजकुमार नारायण पाटील, संचालक जितेंद्र बापूराव सोनवणे आणि हिरालाल दौलत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धुळे जिल्ह्यातील जनतेने आकर्षक परतावा तसेच दामदुप्पट करण्याची खोटी हमी देणारे व आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या किंवा मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या संचालक, प्रतिनिधी, एजंट यांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच आपल्या मेहनतीचा व कष्टाचा पैसा कुठेही गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. असे केल्याने कोणाचीही फसवणूक होणार नाही असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. तसेच देवपूर पोलिस ठाण्यातील फसवणूक प्रकरणात ठेवीदारांनी पोलीस ठाण्यास संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Back to top button