सर्व चित्रपट रसिक दरवर्षी ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून (दि.२०) गगोव्यात सुरु होणार आहे. बॉलिवूडची ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्या हस्ते IFFI महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये हा महोत्सव पार पडेल. (IFFI)
प्रसिद्ध दिगदर्शक, निर्माता करण जोहर आणि रिऍलिटी शोचा निवेदक मनीष पॉल या उद्घाटन सोहळ्याचे निवेदन करणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असणारी इफ्फीची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे.
पणजी शहरात रोषणाई आणि रंगीबेरंगी सजावटीने एक वेगळाच माहौल तयार झाला आहे. यावर्षी अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना 'भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि गोवा मुक्तीची ६० वर्षे या संकल्पनेवर आधारित महोत्सवाची थीम असणार आहे. दरम्यान, शहरात सर्वत्र या संकल्पनेवर आधारित रंगरंगोटी व सजावट करण्यात आली आहे.
यावर्षी ७३ देशातील १४८ सिनेमांचे सादरीकरण होणार आहे. पैकी विविध विभागातील १०९ चित्रपटांचे प्रीमियर महोत्सवात केले जाणार आहेत. यामध्ये जागतिक १२, आंतरराष्ट्रीय ७, आशिया २६ आणि भारतीय ६४ सिनेमे असणार आहेत. ९४ देशांमधून ६२४ सिनेमे महोत्सवासाठी आले होते.
त्यातील ३००च्या आसपास सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये इंडियन पॅनारोमा, श्रद्धांजली, फिचर, नॉन फिचर असे अनेक विभाग करण्यात आले आहेत. दरम्यान यावर्षी २९५१ प्रतिनिधींनी महोत्सवासाठी नोंदणी केली आहे.
बॉलिवूडचे ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांचे यावर्षी निधन झाले. अभिनेता पुनीत राजकुमार यांचेही याचवर्षी देहावसान झाले. देश-विदेशातील विविध मान्यवरांना श्रद्धांजली सोबत दिलीप कुमार व पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
मूळचे गोव्याचे असणारे सिनेसंकलक वामन भोसले यांचे चित्रपटही दाखविले जाणार आहेत. एजन्ट जेम्स बॉंडची भूमिका सर्वप्रथम साकारणारे सर सिन कॉनरी यांचे चित्रपटही श्रद्धांजली विभागात असणार आहेत.
दरम्यान महोत्सव मिश्र स्वरूपाचा होणार असल्याने जगभरातील ५० चित्रपटांचे प्रत्यक्ष मंचावर सादरीकरण होणार आहे.
जगभरातील विविध ४० चित्रपट मान्यवर महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच बॉलिवूडमधील काही खास चेहरेही महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत.
यामध्ये अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, रितेश देशमुख अभिनेत्री श्रद्धा कपूर, मौनी रॉय, जेनेलिया, राशी खन्ना यांचा असणार आहे. यासोबतच आणखीही प्रादेशिक मालिका, चित्रपट, लघुपट अशा विविध कलाकारांची उपस्थिती असणार आहे.
चित्रपट क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीपासून 'उद्याचे सृजनात्मक युवक' या संकल्पनेअंतर्गत ७५ युवकांची निवड करण्यात आली आहे. या युवकांचे लघुपट, माहितीपट हे स्पर्धेअंतर्गत निवडण्यात आले आहेत. देशभरातून ४०० युवकांनी यामध्ये नोंदणी केली होती. त्यातील ७५ युवक निवडण्यात आले आहेत.
या युवकांना महोत्सवादरम्यान होणाऱ्या मास्टरक्लासमध्ये सहभागी होण्याची विविध चित्रपट निर्माते, दिगदर्शक, कलाकार यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी दिली जाणार आहे.
एकूण राज्य आता उद्याच्या महोत्सवाच्या उद्घाटनाला सज्ज झाले आहे. जगभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून रसिकांचे आगमन होणार आहे.
(फोटो – समीर नार्वेकर, पिनाक कल्लोळी)