

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आई कुठे काय करते या स्टार प्रवाहवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रोज एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण सध्या या मालिकेतील एका प्रसंगामुळे ही मालिका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
अरुंधतीच्या संसारात बिब्बा घालणाऱ्या संजनाला स्वतः अरुंधतीच मदत करताना दिसत आहे. पण या मालिकेतील नवीन घडामोडी प्रेक्षकांना आवडलेल्या नसल्याचे दिसते. या मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार याचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. संपूर्ण देशमुख कुटुंब उभं राहणार संजनाच्या पाठीशी… असे त्यात म्हटले आहे.
संजनाला नोकरी परत मिळवायची आहे. पण त्यासाठी तिचा बॉस तिला तडजोड करण्यास सांगतो. अशावेळी अरुंधतीचे संपूर्ण कुटुंब संजनाला मदत करण्यास पुढे सरसावले असल्याचे दाखवण्यात आलंय. हेच प्रेक्षकांना आवडलेले दिसत नाही.
'अरे कुठे नेऊन ठेवली ही सिरीयल काही logic', 'डोंबिवलीमध्ये माता अरुंधतीच मंदिर उभे करणार' अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.
'आई कुठे काय करते' ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांधिक चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक असणाऱ्या या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत अनेकदा प्रथम स्थान मिळवले होते.
सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, त्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.