हेल्थ पॉलिसी पोर्ट करताय? | पुढारी

हेल्थ पॉलिसी पोर्ट करताय?

मृदुला फडके

सध्याची आरोग्य विमा पॉलिसी आपल्याकडून गरजेपेक्षा अधिक हप्ता वसूल करत असेल आणि सेवा चांगली देत नसेल तर आपण हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटीचा पर्याय निवडू शकता.

आपण विद्यमान विमा कंपनीच्या सेवेतून समाधानी नसाल, जादा हप्ता जात असल्याचे वाटत असेल, समाधानकारक सेवा नसेल, विमा कंपनीबाबत सांशक असाल तर काळजीचे कोणतेही कारण नाही.

कारण भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) आपल्याला विमा कंपनी आणि योजना पोर्ट करण्याची परवानगी दिली आहे.

तीन योजनांची माहिती जाणून घ्या

आरोग्य विमा पॉलिसीला पोर्ट करत असाल तर नवीन कंपनी आपला हप्ता निश्चित करण्यासाठी स्वतंत्र असते. पोर्टच्या काळात आपण उच्च जोखमीच्या श्रेणीत असाल तर कदाचित जुन्या कंपनीच्या तुलनेत नवीन कंपनी अधिक हप्ता वसूल करू शकते. हेल्थ पॉलिसी पोर्ट करण्यापूर्वी हप्त्याचे आकलन करायला हवे आणि यासाठी तीन विमा कंपन्यांच्या योजना तपासून घेतल्या पाहिजेत.

पोर्ट करण्यामागचे 9 कारणे

 

खराब सेवा : सध्याच्या कंपनीकडून दिली जाणारी सेवा चांगली नसेल, तर अनेक विमाधारक अन्य विमा कंपनीचा विचार करतात. सध्याची विमा योजना आणि त्याचे लाभ यापासून आपण समाधानी नसाल तर पोर्टचा पर्याय निवडू शकता. कंपनीची सेवा, खराब अनुभव, हप्ता आदी गोष्टी या दुसर्‍या कंपनीकडे वळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

कमी लाभ : आपण आई-वडिलांसाठी ‘आयुष’ लाभ किंवा आपल्यासाठी मातृत्वकवच घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि विद्यमान पॉलिसीत त्याचा उल्लेख नसेल किंवा कवच नसेल तर पोर्टचा पर्याय निवडायला हवा.

अपुरे कवच : सध्याच्या कंपनीकडून देण्यात येणारे कवच हे गरजेनुसार नसेल आणि अपुरे वाटत असेल तर आपण पोर्ट करू शकता.

डिजिटल फ्रेंडली नसेल तर : आपली विमा कंपनी अजूनही दीर्घकाळ आणि संथ प्रक्रियेचे अवलंब करत असेल, तर एखाद्या डिजिटल फ्रेंडली कंपनीत पोर्ट करण्याबाबत विचार करायला हवा.

रूम भाड्याची मर्यादा : सध्याच्या पॉलिसीत रुग्णालयातील रूम भाड्यावरची मर्यादा.

दाव्यातील किचकटपणा : विद्यमान कंपनीत दावा निकाली काढण्याची प्रक्रिया किचकट असेल तर आपण पोर्ट करू शकता.

लाभ मिळण्यास विलंब : कंपनीकडून भरपाई मिळण्यास विलंब होत असेल तर पोर्ट करणे फायद्याचे राहू शकते.

पारदर्शकतेचा अभाव : एखाद्या कंपनीत पारदर्शकता अभाव असेल, तर ती बाब पोर्ट होण्यास कारणीभूत राहू शकते.

भरपाईतील वाटा : विद्यमान कंपनी आपल्याला शंभर टक्के कवच प्रदान करत नसेल आणि त्यातील काही वाटा आपल्याकडून घेत असेल तर आपण संपूर्ण कवच प्रदान करणार्‍या कंपनीत आपली योजना पोर्ट करावी.

45 दिवस लक्ष ठेवा : आपण आरेाग्य विमा योजना पोर्ट करू इच्छित असाल तर विद्यमान योजनेच्या नूतनीकरणाच्या 45 दिवस अगोदर प्रक्रिया सुरू करावी लागेल. तसेच आपल्याला सध्याच्या कंपनीला माहिती द्यावी लागेल आणि नवीन कंपनीचे विवरण द्यावे लागेल.

आपल्याला मुदतीच्या आतच कोणताही ब्रेक न घेता पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागेल. परिणामी पोर्टिंग प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नूतनीकरणासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळतो.

Back to top button