मुंबई; पुढारी ऑनलाईन : लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळेवर अटकेची टांगती तलवार आहे. तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी अडचणीत सापडली आहे. तिने फेसबूकवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. पण, तिने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आता चितळेला अटक होण्याची शक्यता निर्माण झालीय.
१ मार्च २०२० रोजी चितळेने एक फेसबूक पोस्ट केली होती. तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात. तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू हा शब्द उच्चारला तर घोर पापी, कट्टरवादी!?
पण, अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके व्यग्र आहोत. आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात. आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो'.
तिने असं लिहित विशिष्ट समाजावर आक्षेप घेतला होता. तिच्या या विधानावरून वाद निर्माण झाला. अनेक लोकांनी तिच्या या वक्तव्याचा निषेध करत आक्षेप घेतला होता. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी सुद्धा तिने अशीच खळबळजनक वक्तव्य केली आहेत. मात्र या वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. ९ डिसेंबर रोजी ठाणे जिल्हा न्यायालयाने अटक पूर्व जमीन अर्ज फेटाळला आहे.
"महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात. या केतकीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तिच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. तिच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.