Vikram Vedha : हृतिक-सैफचं ‘अ‍ॅक्शन पॅक्ड थीम साँग ‘बंदे’ रिलीज | पुढारी

Vikram Vedha : हृतिक-सैफचं 'अ‍ॅक्शन पॅक्ड थीम साँग 'बंदे' रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेलं ‘विक्रम वेधा’ चित्रपटातील ‘बंदे…’ हे थीम साँग आज ऑनलाइन लाँच करण्यात आले. ‘बंदे…’ या गाण्यात विक्रमच्या भूमिकेतील सैफ अली खान आणि वेधाची व्यक्तिरेखा साकारणारा हृतिक रोशन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतात. Vikram Vedha या गाण्यातील शब्दरचना विक्रम आणि वेधा या दोन व्यक्तिरेखांमधील द्वंद्व अधोरेखित करणारी आहे. सत्याच्या शोधात निघालेल्या विक्रम वेधाच्या नैतिक अस्पष्टतेचं वर्णन या गाण्यात घडवण्यात आलं आहे. (Vikram Vedha)

गीतकार मनोज मुंतशीर यांनी लिहिलेलं ‘बंदे…’ हे थीम साँग सॅम सी एस यांनी कंपोझ आहे. तर शिवम यांनी ते गायलं आहे.

धडाकेबाज अ‍ॅक्शनचा समावेश असलेल्या ‘विक्रम वेधा’मध्ये विक्रम आणि वेधाच्या रूपात पोलिस आणि गुंड यांचा पाठशिवणीचा खेळ बघायला मिळेल.

या थीम साँगमधील बिट्स यापूर्वी चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये ऐकायला मिळाले होते. ‘विक्रम वेधा’च्या पार्श्वसंगीताचं कौतुक करणाऱ्या प्रेक्षकांकडून याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार दिवसांपूर्वी प्रचंड मागणी असलेलं हे थीम साँग अखेर लाँच केलं आहे.

अ‍ॅक्शन-थ्रिलर असलेला ‘विक्रम वेधा’ पुष्कर-गायत्री या दिग्दर्शक द्वयींनी लिहिला आहे. ‘विक्रम वेधा’ची कथा अनेक उतार-चढाव आणि नाट्यमय वळणांनी सजलेली आहे. कठोर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत सैफ अली खाननं आपला वेगळाच ट्रॅक सेट केला आहे. तो गँगस्टर वेधाच्या भूमिकेतील हृतिक रोशनच्या मागावर आहे.

गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिआ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे. निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Back to top button