तू फक्त हो म्हण : मोनालीसा आणि निखिलची जमली जोडी | पुढारी

तू फक्त हो म्हण : मोनालीसा आणि निखिलची जमली जोडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेम म्हणजे नाजूक, अलवार अनुभूती. अर्थात प्रेम करणे सोपे पण निभावणे अतिशय कठीण. त्यातही पहिल्या प्रेमाची तर बातच न्यारी…प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटातून मोनालीसा बागल आणि निखिल वैरागर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचा दिमाखदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना मोनालीसा आणि निखिल म्हणाले की, एक उत्तम चित्रपट करायला मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. यातील कथा व गाणी प्रत्येकाच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव म्हणाले की, ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली प्रेमकथा आम्ही प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. आमच्या या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील. येत्या १४ ऑक्टोबरला ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेमासाठी त्याग, संघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या या प्रेमवीरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेत? हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणार? यासोबत प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ. गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

मोनालीसा बागल, निखिल वैरागर या जोडीसोबतच ‘नाळ’ व ‘झुंड’ चित्रपटानंतर गणेश देशमुख हे एका वेगळ्या भूमिकेत ‘तू फक्त हो म्हण’ मध्ये दिसणार आहेत. सोबत माजी आमदार तुकाराम बीडकर, सविता हांडे, पुष्पा चौधरी, डॉ.गणेशकुमार पाटील, जोया खान, आकाश ठाकरे, रविशंकर शर्मा, भाविका निकम, राम पारस्कर, योगिनी सोळंके, परमेश्वर गुट्टे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहेत. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीते लिहिली आहेत. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. दिग्दर्शनाची बाजू सांभाळतानाच भास्कर डाबेराव यांनी सुमधुर संगीत चित्रपटाच्या गीतांना दिले आहे.

आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते रविशंकर शर्मा व राहुल चव्हाण हे आहेत. छायांकन मधुरम जे सोलंकी तर संकलन आनंद ए. सिंग यांचे आहे. रंगभूषा समीर कदम, वेशभूषा अमृता पाटील, अंजली भालेराव, अस्मिता राठोड, अभिजीत ठाकूर यांची आहे. कलादिग्दर्शन गणेश पाटोळे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश पतंगे, पंकज बोरे आहेत. तर साऊंड डिझाईन दिनेश उचिल व शंतनू अकेरकर यांनी केले आहे.

 

Back to top button