BBM 4 : “ALL IS WELL” म्हणत येतोय बिग बॉस मराठीचा नवा सिझन, असं असेल घर | पुढारी

BBM 4 : “ALL IS WELL” म्हणत येतोय बिग बॉस मराठीचा नवा सिझन, असं असेल घर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी मनोरंजनाचा बाप परत येतोय! ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो, ज्याने लॉकडाउनमध्ये एंटरटेनमेंट अनलॉक केलं. सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या बातम्यांना आणि चर्चेला उधाण येतं आणि तो येताच सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा असते. कारण चर्चा त्याचीच होते ज्यात काही खास असतं! यावर्षी तो परत येतोय अधिक भव्य स्वरूपात, काही नव्या सरप्राईझेसना घेऊन. तो सज्ज आहे नव्या सदस्यांसोबत, नव्या रूपात. आता ते घर परत येत आहे. एक असं घर ज्याने सदस्यांचे भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने नाती कशी निभवावी हे शिकवलं,जीवनाकडे कसं बघावं आणि कसं जगावं हे शिकवलं. ज्याने सदस्यांची अनेक रूपं पाहिली. (BBM 4 ) “त्या” घरात विविध,बहुरंगी स्वभावांच्या व्यक्ती पुन्हा एकदा एकत्र येणार. त्या घराचा दरवाजा पून्हा उघडणार, कारण कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे. (BBM 4 )

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी. विविध क्षेत्रातील १६ कलाकार घेऊन बिग बॉस मराठी सिझन ४ सज्ज आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे, मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. (BBM 4 )

घर म्हटलं, आणि त्यातून जर चार माणसं एकत्र आली की भांड्याला भांड हे लागतंच. बिग बॉसच्या मराठीच्या या सिझनमध्ये १६ जण एका घरामध्ये राहाणार आहेत ते पण १०० दिवस. म्हणजे रोज तक्रारी होणार, तर कधी हास्य बहार, कधी प्रेम,तर कधी भांडणं… कधी रुसवे – फुगवे तर कधी मैत्री… आपल्या घरात आपण जशी शुल्लक गोष्टींना घेऊन भांडणं करतो तसेच या घरात देखील होणार.

ऑल ईज वेल असं का बरं? कळेल लवकरच कळेल. या घरातदेखील सगळं आलं ईज वेल दिसेल का? या सदस्यांना घरामध्ये एकमेकांसोबत तब्बल १०० दिवस रहायचं म्हणजे काही सोपं नाही. एक घर ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात. असचं एक घर चार वर्षांआधी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. घर परतंय पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात. आणि ते म्हणजे बिग बॉस मराठीचं घर. या घरामध्ये यावर्षी काय विशेष असेल ? काय बदल करण्यात आले असतील ? कोणती थीम असेल ? बिग बॉस मराठीचं या सिझनमधील घर खूप खास आणि आलिशान असणार आहे.

असे असेल बिग बॉसचे घर

बिग बॉसचे घर जवळपास १४,००० चौरस फूट आहे. अशा भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. सगळ्यात पहिले घरामध्ये दाखल झाला की, एक गोष्ट अगदी ठळकपणे दिसून येते ती म्हणजे घरामध्ये रंगांचा अतिशय सुंदररित्या केला गेलेला उपयोग आणि त्यामुळेच घर प्रसन्न, आकर्षक वाटतं. विविध रंगांनी नटलेलं हे बिग बॉस मराठीचं नवं घर कलर्स मराठीला साजेसं असं असणार आहे.

“संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती ती म्हणजे या सीझनचे सूत्रसंचालन कोण करणार हे जाणून घेण्याची. आणि यावर चर्चा देखील चागंलीच रंगली. याबाबत प्रेक्षकांनी अनेक तर्क लावले. महेश मांजरेकरच यावर्षी देखील सूत्रसंचालक असणार हे कळताच सगळ्यांनाच आनंद झाला, पण यावर्षी शाळा जरा वेगळी असणार आहे म्हणजे नक्की काय यावर अनेक बोललं गेले.

महेश मांजरेकर नव्या सिझनबद्दल बोलताना म्हणाले, “बिग बॉस मराठी हा माझ्या अत्यंत जवळचा कार्यक्रम आहे. यावर्षीचा सिझन सगळयांसाठीच खास असणार आहे. कारण, स्पर्धक आणि माझ्यात, तसेच येणाऱ्या पाहुण्यांमध्ये काचेची भींत नसेल. नवा सिझन म्हणजे काहीतरी वेगळं असणारचं. मी यावेळेस जरा “वेगळी शाळा” घेणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्पर्धक अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत असणार आहेत. १६ सदस्य १०० दिवस. कसा असेल त्यांचा हा प्रवास. प्रत्येक आठवड्यामध्ये किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धकांद्वारे तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नॉमिनेट करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टिकून राहील, तो ठरेल चौथ्या सिझनचा विजेता स्पर्धक. बिग बॉस मराठी सिझन ४ साठी येत्या २ ऑक्टोबर संध्या. ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Back to top button