राजस्थान काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, गेहलोत गटाचे पक्षश्रेष्ठींनाच आव्हान, सचिन पायलट यांचीही बंडाची भाषा | पुढारी

राजस्थान काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, गेहलोत गटाचे पक्षश्रेष्ठींनाच आव्हान, सचिन पायलट यांचीही बंडाची भाषा

जयपूर/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राजस्थानमध्ये अशोक गेहलोतविरुद्ध सचिन पायलट असा सत्तासंघर्ष टिपेला गेला आहे. सचिन पायलट यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनू द्यायचे नाही, असा चंग अशोक गेहलोत आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बांधला आहे. तर गेहलोत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास आपणास राजस्थानचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी आस असलेल्या सचिन पायलट यांचा अपेक्षाभंग केल्याने नाराज पायलट यांनी, पक्षश्रेष्ठींनी निर्णय जाहीर केल्यास मीही माझा निर्णय घेण्यास मोकळा आहे, असे जाहीर करीत बंडाची भाषा सुरू केली आहे. एकूणच राजस्थान पंजाबच्या वाटेवर असून, प्रदेश काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

काँग्रेस अध्यक्ष उमेदवारीपूर्वीच गेहलोत आले अडचणीत

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठीची उमेदवारी ही गांधी घराण्यानेच जाहीर केली आहे. गेहलोत यांनी त्यासाठी आधी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर लगोलग केरळला जाऊन राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. मात्र, रविवारी राजस्थानात घडलेल्या घडामोडींनंतर अशोक गेहलोत हेच गांधी घराण्याचे उमेदवार असतील का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

‘एक व्यक्ती, एक पद’ या काँग्रेसमधील धोरणांतर्गत गेहलोत यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल, ते पद सचिन पायलट यांना देऊन या राज्यातील अंतर्गत गटबाजीवर तोडगा काढण्याचा आणि देशभरातील गुर्जर समुदायाला आपल्या बाजूने वळविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न होते. काँग्रेस हायकमांडनेच सचिन पायलट यांचे नाव राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी समोर आणले आणि त्यासाठी आमदारांचे मन वळविण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना जयपूरला पाठविले. दोघांनी बोलावलेल्या बैठकीलाच अशोक गेहलोत समर्थक आमदार उपस्थित राहिले नाहीत, याकडे काँग्रेस हायकमांड कशा नजरेने बघते, त्यावरच गेहलोत यांची अध्यक्षपदी निवड अवलंबून असेल. सचिन पायलट यांच्या गटाने रविवारच्या घडामोडींना गेहलोत यांचे गांधी घराण्याविरुद्ध बंड म्हणून सादर करायला अप्रत्यक्षपणे सुरुवातही केली आहे. अजय माकन, खर्गे यांनी गेहलोतविरोधी प्रतिक्रिया आधीच नोंदविल्या आहेत. परिणामी, राजस्थान मुख्यमंत्रिपदासह काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचा गुंताही वाढलेला आहे.

हायकमांडच्या निर्णयानंतर मी निर्णय घ्यायला मोकळा!

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊन त्यांचे मुख्यमंत्रिपद नाराज सचिन पायलट यांना देण्याचे हायकमांडचे मनसुबे गेहलोत समर्थकांनी उधळून लावले आहेत. सत्तासंघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू असताना, त्याचाच एक भाग म्हणून गेहलोत व पायलट यांना दिल्लीला पाचारण केले असताना, सध्या तरी मी दिल्लीला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया देऊन सचिन पायलट यांनी खळबळ उडवून दिली आहे.

हायकमांडच आता जो घ्यायचा तो निर्णय घेईल. मी जयपूरमध्येच आहे. सध्या तरी दिल्लीला जाणार नाही. हायकमांडकडून काय निर्णय होतो, त्याची मी वाट बघतो आहे. त्यानंतरच काय तो निर्णय मी घेईन, असे सचिन पायलट यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

19 ऑक्टोबरपर्यंत ‘नो बैठक’

सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना जयपूरला पाठवले होते; पण बैठकीला आमदारच आले नाहीत. पक्षाध्यक्ष निवडीपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत आम्ही अशा कुठल्याही बैठकीला येणार नाही, असे या आमदारांनी म्हटले आहे.

निरीक्षकही संतापले

आम्ही बैठक बोलावलेली असताना त्याचवेळी या आमदारांनी आणखी एक बैठक बोलावली. आम्ही म्हणू तोच मुख्यमंत्री असेल, अशा स्वरूपाच्या काही मागण्या या आमदारांनी परस्पर केल्या आहेत. आम्ही त्या मान्य करणार नाही. आम्ही आमदारांची वाट पाहिली; पण ते आले नाहीत. आता आम्ही आमचा अहवाल हायकमांडकडे सादर करू, असे निरीक्षक अजय माकन यांनी सांगितले. दुसरीकडे, बंडखोर आमदारांना अशोक गेहलोत यांचा पाठिंबा असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट म्हटल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

Back to top button