पुणे : सहकारनगर येथील नवसाला पावणारी लक्ष्मी माता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील सहकारनगर येथील लक्ष्मी माता मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विधिवत पूजा करण्यात आली असून मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साधारण हा काळ होता ३० वर्षांपूर्वीचा. सहकारनगर आणि पर्वती यांच्या मधोमध असूनही शिवदर्शन हा परिसर एकूण उपेक्षितच होता. याच परिसरात एका बाजूला असलेल्या माळरानवजा मैदानात एका पत्र्याच्या खोपटात एक छोटंसं देऊळ होतं. परिसर तसा उजाड, देऊळही छोटंसं, खरंतर त्या देवळात कोणता देव राहतो, याचीही कोणाला माहिती नव्हती. त्याच काळात या भागातले आबा बागुल यांना एक स्वप्न पडले अशी आख्यायिका आहे. त्या स्वप्नात पत्र्याच्या खोपट्यात असलेल्या देवळातून हिरे -माणिक -मोती- रत्नजडीत तेजस्वी सुवर्णकलश दैवताच्या ठिकाणातून वर येत असल्याचं दिसायचं.
देवीने दिलेला दृष्टांतामुळे बागुल यांनी परिसराची स्वच्छता केली. आणि मूळ गाभाऱ्याची काळजीपूर्वक पाहणी केली. त्यानंतर आबांना जे स्वप्नात दिसत होतं. त्याची साक्षात अनुभूती आली. तिथे वरदायिनी श्री. लक्ष्मी मातेचं ठाणं असल्याचं लक्षात आलं आणि या साक्षात्कारातून या ठिकाणी देवीच्या मूळ स्थानावर सुंदर आणि भव्य मंदिर उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते.
हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीचे सुबक, सुंदर मंदिर आहे. गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिरावर १०५ सुबक मुर्त्यां कारागिरांनी घडविल्या आहेत. प्रसिद्ध शिल्पकार दादा जगताप यांनी श्री. लक्ष्मी मातेची सुंदर संगमरवरी मूर्ती घडविली आहे.
देवीकडे एखादे मागणे मागितले की पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. यामुळे अनेक भक्त या देवीला नवस करतात. आणि इच्छा पूर्ण झाली की नवस फेडतात. आज हजारो जणांना देवीच्या कृपेची अनुभूती आली आहे. श्री. लक्ष्मी मातेला साकडं घातल्यानंतर आपल्या समस्या सुटतात, संकटातून सुटका होते. मनोकामनांची पूर्ती होते, असा अनुभव भाविकांना येत आहे. त्यामुळे श्री. लक्ष्मी माता मंदिरात कायम भक्तांची रीघ आहे. आज नवसाला पावणारी श्री लक्ष्मी माता म्हणून इथे भाविकांची रीघ दिवसागणिक वाढतच आहे.
हेही वाचलंत का ?
- कोल्हापूर : श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपातील पूजा
- उस्मानाबाद : ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात तुळजाभवानी देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ
- राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव; महसूलमंत्र्यांचे रेणुका मातेला साकडे