सिनेमाची देदीप्यमान वाटचाल | पुढारी

सिनेमाची देदीप्यमान वाटचाल

स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रत्येक क्षेत्रांत मोठमोठे बदल पाहावयास मिळाले आहेत. त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे भारतीय चित्रपट उद्योग. भारतीय चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता तो जगभरात पाहिला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला सामाजिक संदेश देणारे चित्रपट तयार होत राहिले आणि त्यांचा परिणामही व्यापक होता. उदारीकरणाच्या जमान्यात मात्र सामाजिक आशयाचा चित्रपटांशी असलेला संबंध जवळजवळ तुटला. गल्लाभरू चित्रपटांना उधाण आले. आयटम साँग-मसालाचा भरणा होऊन रिमेक, सिक्‍वेलपटांची लाट आली. आज ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट प्रदर्शनाबरोबरच निर्मितीचेही आयाम बदलले आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजअखेर जवळजवळ 75 वर्षांत ज्याप्रमाणे सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडून आले, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक बदल पाहावयास मिळाले. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, असे म्हणतात आणि चित्रपटसृष्टीची स्वातंत्र्यानंतरची वाटचाल पाहता एका अर्थाने ते योग्यही वाटते. गांधीजींच्या काळापासून ‘ग्लोबल इंडिया’पर्यंत जे बदल इतरत्र घडून आले, तसेच चित्रपटसृष्टीतही झाले. दो आँखे बारह हाथ, सुजाता यांसारख्या सामाजिक चित्रपटांपासून जंजीरसारख्या ‘अँग्री यंग मॅन’ पडद्यावर आणणार्‍या चित्रपटापर्यंत आणि तिथून पुढे ‘रुपया सिनेमा’पासून ‘डॉलर सिनेमा’पर्यंतची स्थित्यंतरे समाजमनाच्या बदलत्या स्वरूपाचा आरसाच आहे. अर्थात, चित्रपटांमधील वास्तवाचे प्रमाण घटले आहे, प्रेक्षकांची सहिष्णुता कमी झाली आहे; मात्र रंग दे बसंतीसारखे अपवाद प्रत्येक काळात पाहायला मिळाले आहेत. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय चित्रपटांत राष्ट्रवाद आणि सामाजिक उद्दिष्टे अत्यंत स्पष्टपणे दिसून येत असत आणि परदेशी शासकांच्या सेन्सॉर बोर्डाच्या डोळ्यांत धूळफेक करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न दिसत असे. इतिहासावर आधारित आणि धार्मिक चित्रपटांमधूनही योग्य तो संदेश दिला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला सामाजिक संदेश देणारे चित्रपट तयार होतच राहिले आणि त्यांचा परिणामही व्यापक होता. व्ही. शांताराम यांच्या दहेज चित्रपटानंतर काही राज्यांमध्ये हुंडाविरोधी कायदे करण्यात आले. बिमल रॉय यांच्या दो बिघा जमीन चित्रपटाची परदेशात प्रशंसा झाली.

स्वातंत्र्योत्तर काळातही राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्य चळवळीची गाथा मांडणारे अनेक चित्रपट तयार झाले. यात बहुचर्चित गांधी चित्रपटापासून नेताजी सुभाषचंद्र बोस, आय अ‍ॅम कलाम, शहीद, आनंद मठ, बॉर्डर, चिटगॉन्ग, हकीकत, लक्ष्य, द लिजेंड ऑफ भगतसिंह, मंगल पांडे ः द रायझिंग, उपकार अशा चित्रपटांचा समावेश होतो. स्वातंत्र्य चळवळीतील युवा नायकांच्या आठवणी ताज्या ठेवण्यात हिंदी चित्रपटसृष्टीची भूमिका मोलाची ठरली. तसे पाहायला गेल्यास भारतीय स्वातंत्र्य संग्रामात लक्षावधी, कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतला होता. परंतु, अनेक युवा नायक स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक मानले गेले. राष्ट्रधर्मासाठी क्रांतीची पहिली गोळी झाडणार्‍या नायकाला तोफेच्या तोंडी देण्यात आले असले, तरी जी आग त्या युवा क्रांतिकारकाने चेतविली, तिनेच पुढे अनेकांना क्रांतीच्या तर अनेकांना अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढण्याची प्रेरणा दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्या चित्रपटांमुळे आजही स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी ताज्या होतात आणि देशभक्तीची भावना प्रेक्षकांच्या मनात जागृत होते. चित्रपटांबरोबर चित्रपट गीतांनीही राष्ट्रभक्तीची भावना मनामनात तेवत ठेवली. हिंदी चित्रपटांमधील अशी शेकडो गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर आणि मनामनात रेंगाळत राहिली.

स्वातंत्र्योत्तर हिंदी चित्रपटांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला, याची अनेक उदाहरणे आहेत. भारतीय चित्रपटाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास असला तरी खरा इतिहास स्वातंत्र्योत्तर चित्रपटांनी घडविला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1913 मध्ये तयार झालेला राजा हरिश्‍चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट होय. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 108 वर्षे झाली. त्यानंतर निर्मात्यांनी सामाजिक विषयांवरील चित्रपटांची निर्मिती सुरू केली. अलम आरा हा पहिला हिंदी बोलपट ठरला. या चित्रपटानंतर अनेक प्रयोग चित्रपटसृष्टीत सुरू झाले. राज कपूर यांचा जागते रहो, आवारा हे चित्रपट असोत वा गुरुदत्त यांचे प्यासा आणि कागज के फूल हे चित्रपट असोत, त्यात मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नव्हे तर या चित्रपटांनी समकालीन जाणिवांना उजाळा दिला. 1050 ते 60 हा कालावधी असा होता, जेव्हा चित्रपटसृष्टीला बरेच सुपरस्टार मिळाले. यात दिलीप कुमार, देव आनंद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. या कलावंतांनी प्रदीर्घ काळ रसिकमनावर अधिराज्य गाजवले.

प्रादेशिक चित्रपटांचाही विस्तार होऊ लागला. तमिळ, तेलुगू, बंगाली, भोजपुरी, मराठी, मल्याळम, गुजराती अशा भाषांमधील चित्रपट आज भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख बनले आहेत. भारतीय भाषांमधील या चित्रपटांनी आजमितीस परदेशांतही वाहवा मिळविली आहे. बाहुबलीसारखे चित्रपट याचे उत्कृष्ट उदाहरण मानता येईल. आज भारतीय चित्रपटसृष्टीत दरवर्षी 1500 ते 2000 चित्रपटांची निर्मिती केली जाते. या संख्येचा विचार करता भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील सर्वांत मोठा चित्रपट उद्योग ठरतो. भारतीय चित्रपटही आज जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीनबरोबरच आशियाई आणि आखाती देशांत हिंदी चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग आहे. हॉलीवूडची चित्रपटसृष्टी मोठमोठ्या सेटसाठी आणि विषयांमधील वैविध्यासाठी प्रसिद्ध असली, तरी चित्रपट निर्मितीच्या बाबतीत भारतीय चित्रपट उद्योगाच्या कितीतरी मागे आहे, हे समजून घेतले पाहिजे. बॉलीवूडच्या चित्रपटांमधील नायक-नायिकांना आज जगात एक वेगळीच ओळख मिळाली आहे. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, प्रियांका चोपडा, दीपिका पदुकोण, इरफान खान, रजनीकांत यांसारखे सेलिब्रिटी जगभरात भारतीय चित्रपटसृष्टीची शान म्हणूनच ओळखले जातात.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रत्येक क्षेत्रांत मोठमोठे बदल पाहावयास मिळाले आहेत. त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे भारतीय चित्रपट उद्योग. भारतीय चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता तो जगभरात पाहिला जातो. 1951 हे वर्ष चित्रपटांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. याच वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला होता आणि आवारा या चित्रपटापासून भारतीय चित्रपटांसाठी परदेशातील बाजार खुला झाला. त्यानंतरचे 1973 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. ‘अँग्री यंग मॅन’चा चेहरा घेऊन पडद्यावर आलेले महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ आणि राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटातील किशोरवयीन मुलामुलीची प्रेमकथा याच वर्षी पडद्यावर झळकली होती.

समाजातील अत्याचारांविरुद्ध उभा राहणार्‍या नायकाचा चेहरा अमिताभ बच्चन यांच्या रूपाने समाजाला मिळाला आणि अन्यायावर प्रहार करणारा नायक तिथून पुढे आजतागायत पडद्यावर दिसत आहे. अमिताभ यांच्या उदयाच्या कालखंडातच चित्रपटसृष्टीतील गॉसिप वाचकांपर्यंत पोहोचविणार्‍या रंगीत मासिकांचे प्रकाशन सुरू झाले आणि चित्रपट तारे-तारकांच्या बाबतीत खर्‍या-खोट्या अनेक कहाण्या छापून येऊ लागल्या. चित्रपटांवर गंभीर विचार आणि समालोचनाचे महत्त्व कमी झाले. चित्रपटसृष्टी म्हणजे एक रंगबिरंगी दुनिया, असा समज रूढ होऊ लागला. ही दुनिया सर्वसामान्य लोकांच्या जगण्यापेक्षा खूप वेगळी असते असा समज दृढ झाला चित्रपटांमधील तारे-तारकाही आपल्यापेक्षा खूप वेगळे असतात, असे मानले जाऊ लागले.

आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा काळ आला, तेव्हा घराघरात टीव्ही पोहोचलेला होता. ‘शोले’च्या काळात जन्मलेली पिढी हाच या काळात चित्रपटांचा प्रमुख प्रेक्षकवर्ग ठरला होता. पूर्वी चित्रपटगृहात खालच्या मजल्यावर बसणारे प्रेक्षक या काळात बाल्कनीत आले आणि बाल्कनीतील प्रेक्षक घरीच टीव्हीवर मनोरंजन करून घेऊ लागले, असे मानले जाते. या काळात पडद्यावर येणार्‍या चित्रपटांत अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांप्रमाणे व्यवस्थेविषयी आक्रोश नव्हता. भ्रष्टाचारासह सर्व वाईट गोष्टी समाज जणू नित्याच्या म्हणून स्वीकारू लागला होता. इतिहासबोध, साहित्यबोध किंवा सौंदर्यबोध यांच्याशी या पिढीला काही देणेघेणे राहिले नाही. ‘हम आपके है कौन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने सामाजिक आशय असलेले चित्रपट जणू कालबाह्य झाले आहेत, असेच दाखवून दिले. या काळात समाजात नवश्रीमंत वर्गाचा उदय झाला आणि छानछोकी, उधळपट्टी, उपभोग हेच जीवन असल्याचा समज दृढ होत गेला. एकाच जगात श्रीमंतांचे दुसरे जग उदयास आले आणि त्या जगाची भुरळ सर्वच आर्थिक स्तरांमधील लोकांना पडली. चित्रपटसृष्टीने बहुतांश हेच जीवन चित्रित करून गल्लाभरू चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. आज हीच वाटचाल अधिक गडद झाली असून, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट प्रदर्शनाबरोबरच निर्मितीचेही आयाम बदलले आहेत. अर्थात उत्तर आधुनिकवादाच्या, स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरणाच्या आणि ‘फिलगुड’च्या या जमान्यातसुद्धा काही सांगू पाहणारे आशयघन चित्रपट आले; येतात आणि येत राहतील.

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असताना सिनेमाउद्योगापुढे ओटीटीने उभे केलेले आव्हान डोंगराएवढे मोठे आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीची लोकप्रियता प्रचंड वाढली. कोरोनापूर्व काळात गेल्या काही वर्षांत सिनेमागृहांत जाऊन चित्रपट पाहणार्‍यांची संख्या कमी होत चालली होती. तशातच आता ओटीटीचा प्रसार आणि वापर लक्षणीयरित्या वाढल्यामुळे येणार्‍या काळात भारतीय सिनेमा उद्योगाचे भवितव्य कसे असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • सोनम परब

 

Back to top button