कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक | पुढारी

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांना एम्समधील आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर एम्सच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह एम्सच्या संचालकांच्या संपर्कात आहेत. राजनाथ सिंह यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

५८ वर्षीय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. “त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत,” असे सूत्राच्या हवाल्याने पीटीआयने वृत्त दिले आहे.

श्रीवास्तव यांचे चुलत भाऊ अशोक श्रीवास्तव यांनी बुधवारी सांगितले होते की, राजू यांना जीममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. “ते त्यांचा नियमित व्यायाम करत होते. पण ते ट्रेडमिलवर असताना अचानक खाली कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना ताबडतोब एम्स रुग्णालयात नेण्यात आले,” असे त्यांनी सांगितले होते.

राजू श्रीवास्तव १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. ते २००५ मध्ये “द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज” या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात सहभागी झाले होते. त्यानंतर कॉमेडियन म्हणून त्यांना खरी ओळख मिळाली. त्यांनी “मैने प्यार किया”, “बाजीगर”, “बॉम्बे टू गोवा” (रिमेक) आणि “आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया” या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ते “बिग बॉस” सीझन ३ मधील स्पर्धकांपैकी एक होते. श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

Back to top button