अभिनेते अनुपम खेर यांच्या आई, भावासह चौघे पॉझिटिव्ह | पुढारी

अभिनेते अनुपम खेर यांच्या आई, भावासह चौघे पॉझिटिव्ह

मुंबई: पुढारी ऑनलाईन

बी टाऊनमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील इतर तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

अनुपम खेर यांची आई दुलारी खेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबई येथील कोकिलाबेन या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आईसह अनुपम खेर यांच्या भावाला, वहिनीला आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, अनुपम यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यांनी स्वतः अनुपम एक व्हिडिओ ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

अनुपम खेर ट्विटमध्ये काय म्हणतात…

‘गेल्या काही दिवसापासून माझी आई ज्यांना तुम्ही दुलारी या नावाने ओळखता त्यांना भूक लागत नव्हती. ती काहीच खात नव्हती. केवळ झोपत होती. त्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची चाचणी करून घेतली. पण त्यात कोणताच दोष आढळला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी सिटी स्कॅन सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. तिथे चाचणी केली असता तिची चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच, आईच्या अहवालानंतर इतर घरातल्यांची चाचणी केली. त्यात भाऊ राजू, वहिनी आणि पुतणी यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. मात्र, माझी चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य आहे.’

Back to top button