सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास योग्य दिशेने | पुढारी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास योग्य दिशेने

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत वांद्रे पोलिसांनी 56 जणांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली आहे, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु असून योग्य वेळी तपासाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात येईल, आत्महत्येपूर्वी सुशांतच्या घरी पार्टी झालीच नाही, इमारतीच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात राजीवनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता, मात्र हा गुन्हा मुंबईत घडला असल्याने त्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करणे गरजेचे होते, उलट बिहार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली, मुंबई शहरात बिहार पोलिसांना तपास करण्याचा अधिकारच नाही असे स्पष्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले. 

सुशांत आत्महत्येप्रकरणी राजकीय वातावरण तापल्यानंतर तसेच बिहार आणि मुंबई पोलीस आमनेसामने आल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलिसांची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर त्याचा फ्लॅट सील करुन त्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता. पंचनामा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी कालिना येथील फॉन्सिक आणि कूपर हॉस्पिटलची टिमने फ्लॅटचा पुन्हा पंचनामा करत फ्लॅटचा ताबा राजपूत कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन आतापर्यंत 56 जणांची जबानी नोंदवून घेतली आहे. 

पार्टी झाल्याच्या आरोपांचे खंडण 

सुशांतच्या घरी पार्टी झाल्याचा आरोप आहे, मात्र या वृत्ताचे पोलीस आयुक्तांनी खंडन केले आहे.  13,14 जूनचे इमारतीचे सीसीटिव्ही फुटेज घेण्यात आले होते, त्यात पार्टी झाल्याचे दिसून आले नाही. सुशांतच्या फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकच्या जबानीतून पार्टीविषयी काहीच उलघडा होऊ शकला नाही. पार्टीबाबत पुरावे सापडले नाही. सुशांतसंदर्भात बिहारमध्ये गुन्हा दाखल असला तरी हा गुन्हा मुंबई शहरात झाला आहे. 

Back to top button