रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी सुरू | पुढारी

रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी सुरू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समन्स बजावल्यानंतर रिया चक्रवर्ती चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बेलार्ड पीयर येथील कार्यालयात हजर झाली आहे. दुपारी बारा वाजल्यापासून ईडी अधिकाऱ्यांनी रियाची कसून चौकशीला सुरुवात केली आहे.

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियासह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिहार पोलिसांकडून याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच ईडीने या गुन्ह्याच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला. यात सुशांतचे सीए संदीप श्रीधर, नोकर सॅम्युअल मिरांडा यांचाही जबाब नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने गुरुवारी रियाला चौकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली होती. 

बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याच्या मागणी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत आपला जबाब नोंदवू नये, अशी विनंती रियाने ईडीकडे केली होती. मात्र ईडीने कठोर भूमिका घेत शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर न झाल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा रियाला दिला होता. त्यामुळे रिया नरमली. अखेर ती दुपारी बारा वाजण्याच्या आधीच ईडी कार्यालयात हजर झाली आहे. 

ईडीने आता रियाकडे मोर्चा वळवला असल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्या सर्व आर्थिक व्यवहारांसह सुशांतशी संबंधित खात्यातील पैशांबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, रियाच्या नावावर असलेल्या दोन फ्लॅटबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान यापूर्वी मुंबई आणि पाटणा पोलिसांनी रियाकडे चौकशी करत तिचा जबाब नोंदवला आहे.

Back to top button