पूर्वाश्रमीच्या दोन पत्नींकडून अनुरागची पाठराखण | पुढारी

पूर्वाश्रमीच्या दोन पत्नींकडून अनुरागची पाठराखण

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक शोषणाचा  आरोप झाल्यानंतर त्याच्या पूर्वाश्रमीच्या दोन पत्नी कल्की कोचलिन आणि आरती बजाज यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी त्याची पाठराखण केली आहे.

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर अनुरागने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागला पाठिंबा दिला आहे. कल्की आणि अनुराग 2011 ते 2015 दरम्यान नात्यात होते. तर आरती बजाज आणि अनुराग 2003 ते 2009 दरम्यान एकमेकांसोबत होते. कंगना राणावतने लैंगिक शोषण प्रकरणात अनुरागला अटक करण्याची मागणी केली होती. कल्कीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, सोशल मीडियाची ही सर्कस तुझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस. स्क्रिप्टच्या माध्यमातून तू महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढला आहेस. कामातून तसेच खासगी आयुष्यातही महिलांसाठी तू काम केले आहेस.

दुसरीकडे, रविवारी अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनुरागला पाठिंबा दर्शवला होता. तू रॉकस्टार आहेस. महिला सबलीकरणासाठी तू करीत असलेले काम यापुढेही चालूच ठेव, असे तिने म्हटले आहे. जर प्रत्येकाने आपली एनर्जी योग्य ठिकाणी वापरली तर जग सुंदर होईल, असेही तिने म्हटले आहे. हा एक स्टंट असल्याचा आरोप तिने केला आहे.  याशिवाय अनुराग कश्यपसोबत काम करणार्‍या  तापसी पन्‍नू, सय्यामी खेर, ऋचा चढ्ढा, अमृता सुभाष यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागला पाठिंबा दिला आहे.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुरागसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.  मी आतापर्यंत भेटलेल्या प्रामाणिक, प्रेमळ आणि खर्‍या व्यक्‍तींपैकी तू एक आहेस. तू सेटवर नेहमी माझा आणि तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्‍तीचा आदर केला आहेस. मी हे शब्दांत कधीच बोलले नाही. कारण, आपल्या नात्यात त्याची गरज नव्हती; पण आज मी तू मला दिलेल्या आदराबद्दल धन्यवाद बोलेन, असे म्हटले आहे. अभिनेत्री तापसी पन्‍नूने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनुरागला पाठिंबा दिला होता. माझ्या मित्रा, मला माहीत असलेल्यांपैकी तू महिलांचा आदर करणार्‍यांपैकी एक आहेस. सेटवर लवकरच भेटू. तू निर्माण करत असलेल्या विश्‍वात स्त्रिया किती सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे त्यातून (चित्रपटातून) स्पष्ट होणार आहे, असे तापसीने पोस्टमध्ये म्हटले होते.

थोडी तरी मर्यादा बाळगा, अनुरागचे ट्विट

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही; पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की, स्वत:सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बस्स इतकेच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत,” असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

Back to top button