दाऊद अन् ड्रग्जची एकाचवेळी लागण! | पुढारी

दाऊद अन् ड्रग्जची एकाचवेळी लागण!

मुंबई : सुनील कदम

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास करता करता बॉलीवूड आणि ड्रग्जमाफियांचे कनेक्शन चव्हाट्यावर आले. संपूर्ण देशभर त्यावर बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. मात्र, सिनेकलाकार आणि ड्रग्जचा ‘घरोबा’ नवा नाही. बॉलीवूडला डॉन दाऊद इब्राहिम आणि ड्रग्ज यांची एकाचवेळी लागण झालेली आहे. बॉलीवूड, दाऊद आणि ड्रग्ज हे अभद्र साटेलोटे मागील जवळपास चाळीस वर्षांपासून अबाधित आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूने ते पुन्हा चव्हाट्यावर आले असून संपूर्ण बॉलीवूड संशयाच्या फेर्‍यात  सापडले आहे.

मुंबईच्या अंडरवर्ल्डचे एकेकाळचे बेताज बादशहा करीमलाला आणि हाजी मस्तान यांचे बॉलीवूडमधील अनेक बड्या हस्तींशी असलेले ‘जिव्हाळ्याचे’ संबंध त्या त्या वेळी चांगलेच गाजले होते. बॉलीवूडच्या काही पार्ट्यांमध्ये हाजी मस्तानचे दर्शन आणि मस्तानच्या बंगल्यावर बॉलीवूड कलाकारांची हजेरी यांची रसभरीत वर्णने त्या काळात केवळ सिनेजगताला वाहून घेतलेल्या नियतकालिकांमध्ये छापून यायची आणि अनेकांच्या भुवया उंचावायच्या. त्या काळातील काही हिंदी चित्रपटांना हाजी मस्तानने अर्थसहाय्य केल्याच्याही वार्ता कानी पडायच्या; पण कधी त्याची खोलात जाऊन शहानिशा होताना दिसत नव्हती.

कालांतराने मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील करीमलाला आणि हाजी मस्तानची हुकूमत लयाला गेली आणि 80 च्या दशकात तिथे दाऊद इब्राहिमची वहिवाट निर्माण होत गेली. करीमलाला किंवा हाजी मस्तान हे ‘स्मगलर’ म्हणून जास्त परिचित होते. सोने-चांदी, परदेशी मौल्यवान वस्तू, घड्याळे यांच्याशी त्यांची तस्करी निगडित होती. मात्र अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचा दबदबा निर्माण झाल्यानंतर त्याने मुख्यत: अमली पदार्थांच्या तस्करीकडे मोर्चा वळविला.

कालांतराने दाऊदने करीमलाला आणि हाजी मस्तानच्या पावलावर पावले टाकत बॉलीवूडमध्येही चंचुप्रवेश केला. अनेक बॉलीवूड तारे-तारका दाऊदच्या दरबारात हजेरी लावण्यात धन्यता मानू लागले. त्याचे खुलेआम प्रदर्शन करू लागले, बॉलीवूडच्या काही तारकांचे तर थेट दाऊदशी नाव जोडले जाऊ लागले. अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार या काळात अक्षरश: दाऊदच्या तालावर नाचताना दिसत. हळूहळू बॉलीवूडमध्ये दाऊदची थेट गुंतवणूक सुरू झाली. त्याच्या इशार्‍यानुसार बॉलीवूडमधील अनेक निर्णय घेतले जाऊ लागले.

दाऊदच्या बॉलीवूडमधील या चंचुप्रवेशाच्या जोडीनेच ड्रग्जचाही शिरकाव झाला. त्यापूर्वी बॉलीवूड म्हणजे धुतल्या तांदळासारखे नव्हते. रंगरूप, यश-अपयश, शह-काटशहाच्या बॉलीवूडमधील खेळात नशेला स्थान नसते तरच नवल! पण ही नशाबाजी मद्य आणि  मदिराक्षीपर्यंत मर्यादित होती. पण बॉलीवूडमध्ये दाऊदचे प्रस्थ वाढत गेले, तसतसे बॉलीवूडच्या पार्ट्यांमधील ड्रग्जची धुंदी चढत गेली. बॉलीवूडची पार्टी आणि ड्रग्ज यांचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले.

कालांतराने मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदने देशातून पळ काढून पाकिस्तानात आश्रय घेतला. पण, आपली बॉलीवूडशी असलेली नाळ त्याने आजतागायत तुटू दिलेली नाही. आजही बॉलीवूडवर दाऊदचा दबदबा आणि वरदहस्त आहे. बॉलीवूडशी संबंधित अनेक निर्णय दाऊदच्या इशार्‍यानुसार होतात. दाऊदला त्याची ‘बिदागी’ हस्ते-परहस्ते पोहोच करणार्‍यांची बॉलीवूडमध्ये कमी नाही. त्याचप्रमाणे बॉलीवूड आणि ड्रग्ज यांच्यामधील प्रमुख दुवा हे दाऊदचेच नेटवर्क आहे. हे नेटवर्क जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही, तोपर्यंत बॉलीवूडवरील ड्रग्जचा डाग धुतला जाणार नाही.

बॉलीवूडच्या ड्रग्ज पार्ट्या दुर्लक्षित!

बॉलीवूडमधील बहुतेक आघाडीचे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक व  संबंधितांची महाबळेश्‍वर, पाचगणी, रायगड, माथेरान, लोणावळा, खंडाळा, कर्जत आदी ठिकाणी आलिशान फार्महाऊस आहेत. विकेंडला किंवा कारणपरत्वे या फार्म हाऊसवर ड्रग्ज पार्ट्या रंगतात. कधीतरी कुठल्या तरी रेव्ह पार्टीवर छापा टाकून स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या पोलिसांना बॉलीवूडमधील या ड्रग्ज पार्ट्या दिसू नयेत, याचे आश्‍चर्य वाटते. बॉलीवूडचे राजकीय लागेबांधे आणि अर्थपूर्ण संबंध सारे काही निभावून नेतात.

Back to top button