झायरा वसीम नंतर आता अभिनेत्री सना खानचा सिनेइंडस्ट्रीला रामराम!    | पुढारी

झायरा वसीम नंतर आता अभिनेत्री सना खानचा सिनेइंडस्ट्रीला रामराम!   

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री सना खाननेही फिल्म इंडस्ट्रीला रामराम म्हटलं आहे. दंगल गर्ल झायरा वसीमनेही सिनेइंडस्ट्री सोडताना आपल्या धर्माचे कारण देत इंटस्ट्रीचा निरोप घेतला होता. याबाबतची माहिती सनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. तिने इंडस्ट्री सोडण्यामागील कारण इस्लाम असल्याचे म्हटले आहे. सना म्हणाली की, तिला मानव सेवा करायची आहे आणि ती आतापासून अल्लाहच्या आदेशांचे पालन करेल.

सना खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रोमन, इंग्रजी आणि अरबी, तीन भाषेत पोस्ट शेअर केली आहे. सनाने लिहिलं आहे की, ‘भाऊ आणि बहिणींनो…आज मी माझ्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावरून बोलत आहे. मी अनेक वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. आणि त्यामुळे मला प्रसिध्दी, आदर आणि संपत्ती मिळाली. त्यासाठी धन्यवाद.’ 

सनाने पुढे लिहिलंय, ‘आता काही दिवसांपासून मला असं वाटतयं की, माणूस केवळ जगात या उद्दिष्टाने येतो का की, केवळ संपत्ती आणि प्रसिध्दी मिळावी? त्याने आपल्या आयुष्यात मानव सेवा करावी, हे त्याचे कर्तव्य नाही का, जे निराधार आहेत? माणसाने हा विचार करायला नको का की, त्याला कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो? आणि मेल्यानंतर त्याचे काय होणार आहे? या दोन प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात मी होते. खासकरून मेल्यानंतर माझं काय होईल.’

सनाने लिहिलंय, ‘या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी माझ्या धर्मात शोधलं तेव्हा मला समजलं. यासाठी मी आज जाहीर करते की, आजपासून मी माझी शो-बिजचे आयुष्य सोडून मानव सेवा आणि परमेश्वराच्या आदेशावर चालण्याचा निर्णय पक्का केला आहे. खूप खूप धन्यवाद.’

सना खानने २००५ मध्ये ‘यही है हाय सोसायटी’तून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर तिने बॉम्बे टू गोवा, धन धना धन गोल, हल्ला बोल, जय हो, वजह तुम हो यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. काही दिवसांपूर्वी सना वेब सीरीज स्पेशल ऑप्समध्ये दिसली होती. हिंदी चित्रपटांशिवाय सनाने तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

 

 

Back to top button