तेजस्विनी पंडितने अन्नदात्याचे मानले आभार | पुढारी

तेजस्विनी पंडितने अन्नदात्याचे मानले आभार

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीवेळी नऊ दिवस सामाजिक संदेश देणारे फोटोशूट करण्याचा एक पायंडा सिनेसृष्टीत पाडला आहे. दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांसमवेत तेजस्विनी पंडित नवरात्री स्पेशल फोटोशूट करत असते. यंदा आपल्या इलेस्ट्रेशन फोटो सीरिजमधून तेजस्विनी कोरोनायोध्द्यांना आदरांजली अर्पण करतेय. पहिल्या दिवशी डॉक्टरांना, दुसऱ्या दिवशी पोलिसांना आणि तिसऱ्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांना ट्रिब्यूट दिल्यावर तेजस्विनीने चौथ्या दिवशी शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली आहे.

पाठीवर बाळाला बांधून शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी आईचे रूप धारण करून जणू अन्नपूर्णा देवीचं शेताच्या बांधाऱ्यावर राबत असल्याचा भास ह्या फोटोतून होतो आहे. या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “वर्क फॉर्म होम करण्याची मुभा नोकरदार माणसांना असते. शेतकऱ्याला कसलं आलंय, वर्क फॉर्म होम… अतिवृष्टी होवो, वा दुष्काळ पडो, टोळधाडीचं संकट येवो वा कोरोना… कुठलीही नैसर्गिक, प्राकृतिक आपत्ती आली तरी, अन्नदात्याला मात्र लॉकडाऊनमध्ये बसता येत नाही. त्याला उन्हा-तान्हात, पावसा-पाण्यात, थंडी-वा-यात कंबर कसून काम करावेच लागते.”

तेजस्विनी सांगते, “आपल्याकडे अन्नपूर्णादेवीची आराधना करण्याची प्रथा आहे. आपल्यासाठी शेतात ३६५ दिवस राबणारी ही शेतकरी महिला अन्नपूर्णाच तर आहे. आपल्या तान्हुल्याला पाठीशी बांधून तिने काम केले नाही, तर आपली कुठली पोटाची खळगी भरणार.. त्यामूळेच आपल्यापर्यंत ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ पोहोचवणाऱ्या’ अन्नदात्याचे शतश: आभार.’ 

वाचा –एनसीबीच्या विरोधात दीपेशची हायकोर्टात धाव

Back to top button