पुढारी ऑनलाईन डेस्क
बिग बी अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यांचा झुंड हा चित्रपट चर्चिला जातोय. या चित्रपटाची कहाणी स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवन कहाणीवर आधारित आहेत. जे गरीब होतकरू मुलांना फुटबॉल खेळायला शिकवतात आणि त्यांची फुटबॉल टीम तयार करतात. तुम्हाला माहिती आहे का, विजय बारसे कोण आहेत? त्यांच्याविषयी जाणून घ्या या गोष्टी.
नागराज मंजुळेच्या झुंड या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आज ४ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटामध्ये फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारलीय. अमिताभ यांनी विजय यांची व्यक्तीरेखा साकारलीय. खुद्द विजय बारसे हे नागपूरचे आहेत.
विजय यांनी आमिर खानचा शो सत्यमेव जयतेमध्येही हजेरी लावली होती. त्यांनी आपली कहाणी या शोमध्ये कथन केली होती. ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये सन २००० आधी क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. एकदा त्यांनी पाहिलं की, काही मुले मळकट कपडे घालून भर पावसात तुटलेल्या बादलीला कशाप्रकारे जोरदार किक मारून खेळत आहेत? त्यावेळी विजय यांनी फुटबॉल खेळण्याची त्या मुलांना ऑफर दिली आणि मुलांनी ती आनंदाने स्वीकारलीही. विजय यांनी दुसऱ्यांदा पाहिलं की, दुसऱ्या मुलांचा एक ग्रुप टेनिस बॉलला किक मारून खेळत होता. लवकरचं या सर्व मुलांना त्यांनी एका खेळाच्या मैदानावर एकत्र आणलं. त्यानंतर विजय यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्यासोबत मिळून एक टूर्नामेंट आयोजित केली. यामध्ये केवळ झोपडपट्टीतील मुले सहभाग घेऊ शकतात, अशी योजना तयार केली.
२००१ मध्ये विजय यांनी "स्लम सॉकर"ची स्थापना केली. विजय हे नागपूरचे आहेत. नागपूरमध्ये एक टूर्नामेंटचे आयोजन केलं. या टूर्नामेंटमध्ये १२८ टीमने भाग घेतला होता.
ती मुले वाईट सवयीमुळे खेळापासून दूर गेली होती. एखादा शिक्षक त्यांच्यासाठी काय करू शकतो? असे विजय यांनी सत्यमेव जयते या शोमध्ये सांगितलं होतं. यानंतर विजय यांचा प्रवास सुरू झाला. २००२ मध्ये झोपडपट्टी फुटबॉलचे आयोजन करण्यात आले आणि तेथून सुरू झाला स्लम सॉकरचा प्रवास. विजय हे स्लम सॉकर नावाने प्रसिध्द झाले.
TEDx शी बोलताना विजय म्हणाले होते-मला माहित होतं की, सर्व खेळाडू झोपडपट्टीतून आहेत. मला त्यांच्यासाठी काम करायचं होतं. म्हणून मी हे नाव पुढे तसेचं ठेवलं. सुरुवातीला त्यांना कुठल्याही प्रकारची मदत वा फंड मिळालं नाही. त्यांनी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च केले. २००३ मध्ये एका वर्तमानपत्रात त्यांच्याविषयी लेख प्रसिध्द झाला, त्यावेळी ते प्रसिध्दीच्या झोतात आले.
विजय यांचा मुलगा अमेरिकेत राहायचा, त्याने हा लेख वाचला आणि आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो तेथील नोकरी सोडून भारतात परतला.