नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
युद्ध जरी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असले तरी देशातील याची झळझळ मात्र घराघरांत पोहोचली आहे. या युद्धामुळे पाम तेल आणि सूर्यफुलांच्या किंमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांसाठी फोडणही महागली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. युद्धामुळे युक्रेनमधील सर्व बंदर व्यापारासाठी बंद करण्यात आले आहेत. याचा फार मोठा परिणाम दळणवळणावर झालेला आहे.
रशिया आणि युक्रेनमधून जगभरात गहू, मका आणि बार्ली जगभरातील विविध देशांना पुरवतो. जगातील एकूण सूर्यफुलांच्या तेलापैकी ७५ टक्के सूर्यफुलाचे तेलाच्या वाहतूक ही युक्रेनमधील बंदरांतून होते. जागतिक मागणीचा विचार केला तर सर्व खाद्यतेलांत सूर्यफुलाचे तेल ४ नंबरवर आहे. त्यामुळे सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमती वाढू लागल्या आहेत. सूर्यफुलाच्या तेलाची टंचाई निर्माण झाल्याने सोयाबीन आणि पाम तेलाची मागणी वाढून त्यांच्याही किंमती वाढू लागल्या आहेत.
इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. मुंबईतील खाद्यतेलांची ब्रोकर कंपनी सनविनचे प्रतिनिधी अनिलकुमार बगानी यांनी म्हटले आहे की, "काळ्या समुद्रातून होणारी सर्व आयात थांबली आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या पुरवठ्यात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे."
या जोडीने इतरही समस्या निर्माण झालेल्या आहेत. ब्राझिलमध्ये आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादन घटले आहे. तर कॅनडात दुष्काळी परिस्थितीमुळे कॅनोल पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. तर इंडोनेशियाने पामतेल स्वतःच्या अंतर्गत गरजांसाठी राखून ठेवले आहेत. तर दुसरीकडे मलेशियात कामगार तुडवड्यामुळे पाम तेलाचे उत्पादन घसरले आहे.
भारतात जे काही खाद्यतेल लागते त्यातील ६० टक्के बाहेरून मागवावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेता देशातील खाद्यतेलाच्या किंमती मात्र आता वाढू लागल्या आहेत.