अभिनयातील ‘देव’ काळाच्या पडद्याआड; प्रख्यात अभिनेते रमेश देव यांचे निधन | पुढारी

अभिनयातील 'देव' काळाच्या पडद्याआड; प्रख्यात अभिनेते रमेश देव यांचे निधन

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून मुलगा अजिंक्य देव अभिनेता तर दुसरा मुलगा अभिनव हा दिग्दर्शक आहे. आनंद सारख्या प्रसिद्ध चित्रपटासह शेकडो चित्रपट रमेश देव यांनी केले आहेत.

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२६ रोजी झाला. रमेश देव यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये २०० हून अधिक शो केले. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Koo App

प्रख्यात अभिनेते,निर्माते आणि दिग्दर्शक रमेश देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. सुमारे २८५ चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय रंगभूमीवरही त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात जिंदादिल मुशाफिरी करणारे एक जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Supriya Sule (@supriya_sule) 2 Feb 2022

१९५१ मध्ये त्यांनी मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मागतोय एक डोळा या मराठी चित्रपटाद्वारे रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांची सुरुवात खलनायक म्हणून झाली. राजश्री प्रॉडक्शनचा आरती हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन (आनंद), राजेश खन्ना (आप की कसम) सारख्या तारकांना समर्थ साथ दिली.

 VIDEO : रमेश देव यांच्या वाढदिनी ३० जानेवारी रोजी पुढारी ऑनलाईनने त्यांच्याशी संवाद साधला होता.

Back to top button