विदेशी मद्यावर पोलिसांचा वॉच | पुढारी | पुढारी

विदेशी मद्यावर पोलिसांचा वॉच | पुढारी

रत्नागिरी : वार्ताहर

‘थर्टी फर्स्ट’साठी रत्नागिरी जिल्ह्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्य आणले जाते. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात निम्म्या किमतीत मद्य उपलब्ध होत असल्याने मद्यपी गोव्याच्या दारुला अधिक प्राधान्य देतात. गोव्यातील मद्य जिल्ह्यात आणणार्‍यांवर पोलिसांनी वॉच ठेवला आहे.

गोव्यातून छुप्या पद्धतीने दारुसाठा रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आणला जातो. गतवर्षी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला करोडो रुपयांचा दारुसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला होता. गेले तीन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अहोरात्र गस्त सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी कडक नाकाबंदी केल्याने गोवा बनावटीचे मद्य आणणार्‍या दलालांना चांगलाच चाप बसला आहे. 

थर्टी फर्स्टसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. थर्टी फर्स्टच्या सायंकाळपासूनच जिल्ह्यातील 50 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तर किनारी भागात जीवरक्षक दलासह अतिरिक्‍त पोलिस कुमक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी दिली.

किनार्‍यावर वाहन चालवणार्‍या वाहन चालकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. थर्टी फर्स्ट रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रात्रीच्या सुमारास शहरासह ग्रमीण भागात जल्लोषाचे आयोजन करण्यात येते. येथे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे. पार्टीच्या आयोजकांना पोलिसांचा परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना पार्ट्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 50 ठिकाणी नाकाबंदी केली जाईल. त्यामध्ये सर्व शहरांचा समावेश असेल. शहरातून बाहेर जाणारे सर्व रस्त्यांवर पोलिस वाहनांची तपासणी करतील. मद्यपान करून वाहन चालवणार्‍या चालकांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

गणपतीपुळे, मालगुंड येथे स्थानिकांसह पर्यटकांची संख्या अधिक असते. थर्टी फस्टच्या सायंकाळी किनारी भागात स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमण्यात येतील. पर्यटक समुद्राच्या पाण्यात जाऊ नयेत याची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील बीचवर गाड्या घेऊन जाणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळणार्‍या नागरिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. किनारी भागात संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन इंगळे यांनी केले आहे. थर्टी फर्स्टसाठी गोव्यातून रत्नागिरीत येणारे अवैध मद्य जप्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
 

Back to top button