थुंकण्यापासून रोखाल, तर जग जिंकाल | पुढारी

थुंकण्यापासून रोखाल, तर जग जिंकाल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘थुंकण्यापासून स्वत:ला रोखलास, तर जग जिंकलंस’, ‘माझं कोल्हापूर थुंकीमुक्‍त झालंच पाहिजे’, ‘रस्त्यावर थुंकणार नाही, दुसर्‍याचे आरोग्य धोक्यात घालणार नाही’  अशा घोषणांचे फलक हाती घेऊन व घोषणा देत अँटिस्पिट मुव्हमेंटच्या वतीने ‘थुंकीमुक्‍त कोल्हापूर’ चळवळीस रविवारी ताराराणी चौकातून प्रारंभ करण्यात आला. 

अँटिस्पिट मुव्हमेंटच्या वतीने ही चळवळ सुरू केली असून त्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात रविवारी झाली. यावेळी नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोनाचा प्रसार वाढू नये तसेच ही अनिष्ट सवय दूर सारून शहर थुंकीमुक्‍त करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात करण्यात आला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दीपा शिपूरकर, सारिका बकरे यांनी पुढाकार घेतला. 

सुरेश शिपूरकर म्हणाले, कोल्हापुरात अनेक चळवळी यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे थुंकीमुक्‍त कोल्हापूर ही चळवळ देखील यशस्वी होईल. थुंकीमुक्‍त कोल्हापूर झाल्यास आरोग्याचे प्रश्‍नदेखील कमी होण्यास मदत होईल. 

यावेळी आनंद आगळगावकर, राहुल राजशेखर, कविता जांभळे, अभिजित गुरव, गीता हसुरकर, दिपक देवलापूरकर, भानुदास डोईफोडे, समीर पंडितराव, विजय धर्माधिकारी, कल्पना सावंत, स्मिता देशमुख, नीना जोशी, ललित गांधी, मंजुषा खेत्री, ललिता गांधी, अजित तांबे आदी उपस्थित  होते.

रस्त्यावरची पिचकारी वाहनचालकाला नडली

सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर व कार्यकर्ते सकाळी चौकात जनजागृती करत असताना एका वाहनचालकाने रस्त्यावर पिचकारी मारली. हा प्रकार कार्यकर्त्यांच्या नजरेला आला. कार्यकर्त्यांनी चालकाला गराडा घातला. त्याला चूक लक्षात आली. वाहनातील कापड घेऊन चालकाने रस्ता स्वच्छ केला.शिपूरकरसह कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून चालकाचे अभिनंदन केले. या मोहिमेत आपण सहभागी होत असल्याचे चालकाने स्वत:हून जाहीर केले.

Back to top button