एम. के. स्टॅलिन यांनी मारली बाजी | पुढारी

एम. के. स्टॅलिन यांनी मारली बाजी

द्रमुकचे सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन अण्णाद्रमुक, भाजपचा मुकाबला करण्यातही यशस्वी ठरले. पक्ष आणि सरकारमध्ये त्यांनी अंतर्गत कलहांना थारा दिलेला नाही.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या कार्यकाळाचे 200 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांचे सरकार राजकीय व्यवहारचातुर्य, वैचारिक समतोलपणा आणि पूरक सार्वजनिक चेहरे लोकांसमोर आणण्यास यशस्वी ठरले. स्टॅलिनने आपला राजकीय मार्ग स्वत:च तयार केला आहे आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते कामकाजाच्या माध्यमातून प्रभावी ठरत आहेत. त्यांनी केवळ विरोधकांनाच बांधून ठेवले नाही, तर राष्ट्रीय पक्षांनादेखील बाजूला ठेवण्यात ते यशस्वी ठरले. पक्षांतर्गत आणि सरकारअंतर्गत कलह होणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. पक्षबांधणी आणि सरकारी आघाडीवर स्टॅलिन यांनी सर्वांनाच उत्तमरीत्या मॅनेज केले.

स्टॅलिन यांच्या काळात घेतलेले तीन वेगवेगळे निर्णय हे अगदी स्पष्ट आहेत. सर्वात अगोदर त्यांनी सर्व जातींच्या पुजार्‍यांना मंदिरात पूजा करण्याची परवानगी दिली. हा निर्णय द्रविड राजकारणाच्या द़ृष्टीने मोठा मानला जातो. कारण, यासंदर्भात करुणानिधी यांनी अनेकदा भाष्य केले होते; परंतु ते निर्णय घेऊ शकले नाहीत. अर्थात, हा निर्णय घेताना स्टॅलिन यांनी स्वत:ला माध्यमापासून दूर ठेवलेे.

त्यांच्या संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना पुढे केले आणि त्याचा फारसा गाजावाजा केला नाही. तमिळनाडूतील उच्चवर्णीयांना वाटते की, मंदिरात पूजा करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. अशा स्थितीत स्टॅलिन यांनी कोणाचेही मन न दुखवता आणि समाजस्वास्थ्य बिघडणार नाही, अशा रितीने नियोजन करत निर्णयाची अंमलबजावणी केली. त्याचवेळी त्यांनी अन्य जातींच्या लोकांनाही पूजेचा अधिकार मिळू शकतो, असा संदेश दिला.

दुसरा निर्णय हा तमिळ भाषेची संस्कृती आणि महत्त्व जोपासण्यासाठी घेतला. जेव्हा राज्याचे गीत ‘तमिळ थाई वजथू’ म्हटले जाईल, तेव्हा सर्वांनी उभे राहून मातृभाषेचा सन्मान व्यक्त करावा, असा निर्णय घेतला. यासंदर्भात तमिळनाडू सरकारने विभागीय आदेशही जारी केला.
तिसरा निर्णय हा स्टॅलिन यांनी ईव्ही रामास्वामी नायकर यांची जयंती 17 सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय दिवस म्हणून जाहीर करणे होय.

यानुसार राज्य सरकारने सर्व कार्यालय आणि त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी सामाजिक अधिकार दिवस साजरा करण्याचे बंधन घातले. हा निर्णयदेखील द्रमुकच्या द्रविड विचारसरणीला पाठबळ देणारे आहे. एकुणातच स्टॅलिन हे मुरब्बीपणाने वाटचाल करत आहेत. या निर्णयाने मूळ द्रविड विचारसरणी तर केवळ कागदावरच राहणार नाही, याची काळजी स्टॅलिन यांनी घेतली.

स्टॅलिन यांच्याकडून जेव्हा विरोधकांवर हल्लाबोल होतो तेव्हा द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात राजकीय द्वि-ध्रुवीकरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यानुसार भाजपला कोणतीही संधी मिळू नये, असा प्रयत्न स्टॅलिन करतात. भाजपचे नेतेदेखील एम. के. स्टॅलिन यांच्यावर आणि पक्षावर सातत्याने टीका करतात. परंतु, स्टॅलिन थेटपणे उत्तर देण्याचे टाळतात.

यासाठी ते पक्षाच्या नेत्यांना किंवा प्रवक्त्यांना पुढे करतात. त्यांनी केंद्र सरकार नाराज राहणार नाही, याचीही दक्षता घेतली. केंद्र सरकारशी त्यांनी शासकीय संबंध चांगले ठेवले. विकासकामांत संघर्ष होणार नाही आणि निधीचा ओघ थांबणार नाही, यासाठी स्टॅलिन प्रयत्नशील असतात. सकाळी फिरताना किंवा आठवड्यातून एकदा सायकल चालवण्याच्या उपक्रमानिमित्त ते लोकांना भेटतात.

स्टॅलिन यांनी अगदी जमिनीस्तरापासून राजकारणाला सुरुवात केली होती. ते अनेक वर्षे युवा आघाडीचे नेतृत्व करत होते आणि ते प्रसिद्धी मिळवण्याच्या फंदातही पडत नव्हते. अर्थात, त्यांच्या या भूमिकेची खिल्लीही उडवली जायची. स्टॅलिन हे द्रमुकच्या युवा आघाडीचे प्रमुख म्हणूनच निवृत्त होतील, असे तेव्हा विनोदाने म्हटले जायचे. 2018 रोजी करुणानिधी यांचे निधन हेाण्यापूर्वी स्टॅलिन हे सक्रिय होते आणि ते चेन्नई नहानगरपालिकेचे महापौरदेखील झाले. करुणानिधी यांच्या काळात ते दोनदा उपमुख्यमंत्री झाले; परंतु त्यांनी नेहमीच वडिलांच्या सावलीखाली वावरण्यात धन्यता मानली.

2016 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत घटक पक्षाच्या मदतीने शंभरी गाठली; परंतु सत्तेत येऊ शकले नाहीत. यासाठी काँग्रेसला जबाबदार धरण्यात आले. परंतु, स्टॅलिन यांनी कोणाचेही नाव घेतले नाही; पण आज मुख्यमंत्री बनल्यानंतरचा गेल्या 200 दिवसांतील त्यांचा कार्यकाळ चांगला राहिला आहे. जेव्हा सरकार शेवटच्या टप्प्यात येईल, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल, यात शंका नाही.

– के. श्रीनिवासन

Back to top button