चीनची निवडणूक लुडबुड | पुढारी

चीनची निवडणूक लुडबुड

हेमंत महाजन, ब्रिगेडियर

गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगात चीनच्या हेरगिरीचा आणि हस्तक्षेपाचा धोका ही चिंतेची बाब बनली आहे. स्पाय बलूनद्वारे अमेरिकेची हेरगिरी करण्याचे प्रकरण असो किंवा आशिया खंडातील छोट्या देशांच्या राजकारणातील लुडबुड असो, चीनच्या या कुटिल कारवायांची डोकेदुखी वाढत चालली आहे. आता तैवानमध्ये पार पडलेल्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही चीनने एआयच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याची माहिती पुढे आली आहे.

एकविसाव्या शतकात संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि धोका बनलेल्या चीनच्या कुरघोड्यांचे नवनवीन प्रकार नित्यनेमाने समोर येत असतात. चीन हा एकाच वेळी अनेक पातळ्यांवर युद्धनीती आखून चाली खेळत असतो. यामध्ये सायकॉलॉजिकल वॉरफेअर, इन्फर्मेशन वॉर, सोशल मीडिया वॉरफेअर, हेरगिरी, सायबर वॉरफेअर अशा अनेक प्रकारे चीन शत्रू देशांना अडचणीत आणण्याचा किंवा त्यांची माहिती चोरण्याचा, तेथील लोकसमुदायांमध्ये गैरसमज पसरवून त्यांच्यात राष्ट्रविरोधी भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतो. याखेरीज बदलत्या काळातील तंत्रज्ञानाचा नवआविष्कार म्हणून पुढे आलेल्या एआयचा वापरही चीन याच कुटिल हेतूने करत असल्याचे समोर आले आहे.

चीन सोशल मीडियाच्या माध्यमातून एआयद्वारे तयार केलेल्या सामग्रीचा वापर करून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. ‘स्टॉर्म-17’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या गटाकडून तैवानच्या निवडणुकांमध्ये एआयच्या मदतीने बनवलेले बनावट ऑडिओ सपोर्ट आणि मिम्स आदी सामग्री प्रसारित केली गेली. काही उमेदवारांची बदनामी करणे आणि मतदारांच्या धारणा प्रभावित करणे, हा त्या मागचा उद्देश होता. तैवानच्या निवडणुकीदरम्यान ‘बीजिंग-गट स्टॉर्म-17’ने तैवानच्या तत्कालीन डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार विल्यम लाई यांच्या विरोधात दुष्प्रचार केला. फेब्रुवारी पासून ‘स्टॉर्म-36’ने एआय टीव्ही न्यूज अँकर तैनात केले आणि त्यांनी दुष्प्रचार करण्याचा वेग वाढवला.

आता प्रश्न उरतो तो तैवानच्या निवडणुकीत चीनने केलेल्या ढवळाढवळीला किती यश मिळाले? मायक्रोसॉफ्टच्या अहवालानुसार, चीनला निवडणुकीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. तरीही या हस्तक्षेपाचा निवडणुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला, असे मानले जाते. चीनद्वारे तैवान निवडणुकीत केला गेलेला हस्तक्षेप भारतासाठी एक अभ्यासाचा विषय असून, त्यापासून आपण खूप शिकू शकतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने अमेरिकन निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केलेला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी अशाच प्रकारचा आरोप चीनच्या विरोधात केला आहे. चिनी गट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा घेत समाजात फूट पाडणारे प्रश्न निर्माण करतात आणि मतदारांच्या मानसिकतेविषयी गुप्त माहिती गोळा करतात आणि नंतर त्या-त्या भागाला अनुरूप असा दुष्प्रचार करतात. अमेरिकन निवडणूक प्रचारात एआयचा वापर नवीन नाही. 22 च्या न्यू हॅम्पशायर डेमोक्रॅटिक प्रायमरीत आघाडीवर, एआयद्वारे तयार केलेल्या फोन कॉलने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आवाजाची नक्कल केली आणि मतदारांना मतदानात सहभागी होण्याविरुद्ध सल्ला दिला. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी त्यांची मते रोखून ठेवावीत, असा या कॉलने चुकीचा इशारा दिला.

उत्तर कोरियाच्या सहभागासह चिनी राज्य-समर्थित सायबर गट अनेक निवडणुकांना लक्ष्य करतील, अशी शक्यता आहे; कारण चीनला त्या-त्या देशात चिनी समर्थकांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करायची आहे. राजकीय पक्ष चीनविरोधात आहेत, त्यांच्या विरोधात एआयच्या मदतीने दुष्प्रचार युद्ध करून त्यांना हरवायचे आहे. म्हणजे तंत्रज्ञानाची महाशक्ती असलेल्या अमेरिका आणि तैवानसारख्या देशांमध्ये चीनने एआयचा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्यात काही प्रमाणात यश मिळवले. चीनची ताकद एवढी मोठी असेल तर भारताला नक्कीच सावध राहावे लागेल.

मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनीने भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये यंदाच्या वर्षी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून चीन हस्तक्षेप करू शकतो, असा इशारा दिलेलाही आहे. यंदाच्या वर्षी जगभरातील किमान सहा देशांमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि सामाजिक कारणांसाठी एआयचा वापर, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि आरोग्य व कृषी क्षेत्रातील नवकल्पना यांवर चर्चा केली. निवडणुकांदरम्यान प्रभाव वाढवण्यासाठी चीन एआयने तयार केलेली दुष्प्रचार करणारी सामग्री तैनात करेल.

एआयचा वापर करून फसव्या आणि खोट्या सामग्रीच्या निर्मितीसाठी राजकीय जाहिरातींद्वारे उद्भवलेला धोका, ज्यामध्ये डीपफेक किंवा कधीही न घडलेल्या घटनांचा समावेश आहे. उमेदवारांची न केलेली विधाने, विविध मुद्द्यांवरची त्यांच्या भूमिका आणि काही घटनांच्या सत्यतेबाबत जनतेची दिशाभूल करणे हा डावपेचाचा उद्देश आहे. यामुळे मतदारांच्या मनावर परिणाम होतो. भारताच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या असून, त्यांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सात टप्प्यांत होईल. भारताच्या निवडणूक आयोगाने चुकीची माहिती त्वरित ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आधीच मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉल जाहीर केले आहेत. भारताच्या निवडणुकीत चीनची ढवळाढवळ थांबवण्यासाठी भारताने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Back to top button