तडका : थांबवा रे यांना कुणीतरी | पुढारी

तडका : थांबवा रे यांना कुणीतरी

तुम्ही जर कधी रेल्वेने प्रवासासाठी गेलात तर झालेले बदल तुमच्या सहज लक्षात येतील. प्लॅटफॉर्म स्वच्छ झाले आहेत, रेल्वे स्वच्छ आहेत, जागोजागी सुरक्षा कर्मचारी आहेत, जिन्यावरील पायर्‍या चढण्यासाठी सरकते जिने आहेत, प्लॅटफॉर्मवर कोणता डबा कुठे येणार आहे हे रेल्वे येण्याच्या वीस मिनिटे आधी बरोबर दाखविले जाते. त्यामुळे सामान घेऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळापळ करायची काही गरज राहिलेली नाही. बहुतांश वेळेला रेल्वे वेळेवर येत आहेत. तिकिटे काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा आहे.

रेल्वे कुठपर्यंत आली आहे हे दिसणारे अ‍ॅप आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’सारख्या गाड्या तर पंचतारांकित आहेत. एकंदरीत रेल्वे चकाचक झालेली आहे. अगदी तुमच्या डब्यात आलेला टीसीसुद्धा जुन्या काळची बॅग न घेऊन येता, हातामध्ये स्मार्ट टॅब घेऊन येतो आणि आरक्षित प्रवाशांपैकी कोण कोण आले आहे, याची निश्चिती करतो. शिवाय हा सर्व प्रवास अत्यंत कमी पैशात सहज होत आहे. कमी दरात शुद्ध पाणी आणि उत्तम दर्जाचे जेवणही पुरवले जात आहे. जवळपास विमानतळावर असणार्‍या सगळ्या सुविधा रेल्वेच्या प्रवासामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही म्हणाल, ‘हो, हो, हे सगळं माहीत आहे; पण मग विषय काय आहे?’

विषय एवढाच आहे की, कितीही सुविधा केल्या तरी लोकसंख्या वाढीच्या भस्मासुरापुढे त्या कमीच पडत आहेत. अतिशय व्यवस्थितपणे आपण रेल्वे स्टेशनवर येतो. आपल्या मोबाईलमध्ये आधीच काढलेले तिकीट असते. त्यावर आपण कोणत्या डब्यात बसायचे हे सूचित केलेले असते. आपण स्टेशनला येतो, प्लॅटफॉर्म क्रमांक पाहतो आणि सरकते जिने वापरून प्लॅटफॉर्मवर जातो. तिथे आपण आपला डबा कुठे येणार आहे, ते पाहतो आणि तिथे जाऊन उभे राहतो. अगदी काही फुटांचा फरक वगळता डबा आपल्यासमोर येतो आणि आपण त्यामध्ये प्रवासाला निघतो. ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या सीटवर बसता, त्यापुढील दहाच मिनिटांमध्ये प्रचंड संख्येने लोक डब्यामध्ये घुसतात. जनरल डबे कमी असतील, तर सर्रास वातानुकूलित आणि आरक्षित डब्यांमध्ये गर्दी होते. आलेल्या लोकांचा पण नाइलाज असतो कारण जनरल डबा आधीच भरलेला असतो. मग ते लोक सैरावैरा प्लॅटफॉर्मवर धावत सापडेल त्या डब्यात घुसतात आणि डब्यात एकच गर्दी होते. इतकी गर्दी होते की, स्वच्छतागृहापर्यंत जाणेसुद्धा अवघड होते.

संबंधित बातम्या

इतकी गर्दी आरक्षित डब्यांमध्ये होते, याचा अर्थ एकच आहे की, आपण कितीही सुविधा पुरवल्या तरी लोकसंख्येचा राक्षस त्या सर्व सुविधांना गारद करून जय मिळवणार आहे. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी खरेच काहीतरी केले पाहिजे. कधी काळी चाळीस कोटींचा असलेला देश आज 140 कोटींचा होऊन जगात पहिल्या क्रमांकावर जाऊन बसलेला आहे. त्यामुळे सर्वत्र गर्दीशिवाय दुसरे काही दिसत नाही. तीच गत रेल्वे प्रवासाची झाली आहे. अत्याधुनिक आणि सुखावह अशा सुविधा निर्माण केल्या; परंतु जर आपण गर्दी थांबवू शकलो नाही, तर त्या सुविधांचा लाभपण कुणाला मिळणार नाही.

अपंग असलेल्या लोकांना डब्यापर्यंत पोहोचण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यासुद्धा आल्या आणि त्या प्लॅटफॉर्मवर इकडून तिकडे दिमाखात फिरत असतात. हे सगळे झाले असले तरी होणार्‍या गर्दीपुढे सगळे निष्क्रिय ठरते. होत असलेली लोकसंख्या वाढ फक्त रेल्वेच नव्हे, तर सर्वच व्यवस्थांवर ताण निर्माण करत आहे, हे नक्की. 1970 च्या आसपास दोन किंवा तीन पुरे अशी घोषणा होती. पुढे ‘एक या दो बस’ अशी झाली. आता केवळ एकाचाच आग्रह धरण्याची वेळ आलेली आहे. पण तसा कुठे आजकाल प्रचार होताना दिसत नाही.

Back to top button