तडका : वादावर पडदा..! | पुढारी

तडका : वादावर पडदा..!

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणी काही बोलला की, त्याच्याविरुद्ध किंवा त्याच्या बाजूने तत्काळ प्रतिक्रियांचा ओघ सुरू होतो. बोलणारा विरोधी पक्षातील असो किंवा सत्ताधारी पक्षातील असो, क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाऊस पडायला सुरुवात होते. आधीच अवकाळी पडणार्‍या पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजा चिंतित झाला आहे. त्यात पुन्हा विविध प्रकारच्या वक्तव्यांची भर पडते. ‘पीएच.डी. करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत?’ असा प्रश्न एका ‘दादा’ उपमुख्यमंत्र्यांनी विचारला. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले आणि एकच गदारोळ उठला. पीएच.डी.चा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी मोर्चे वगैरे काढले. लगेच दुसर्‍या दिवशी संबंधित मंत्री महोदयांनी ‘पीएच.डी.चा अभ्यास महत्त्वाचा आहे,’ असे विधान करून चूक दुरुस्त करून घेतली.

एखादे प्रकरण घडले की, लगेच त्यावर पडदा पडेल असे महाराष्ट्रात कधीच घडत नाही. विशेषतः शिक्षण क्षेत्राबद्दल कुणी काही उद्गार काढले की, तत्काळ त्या व्यक्तीचे शिक्षण काढले जाते. तसेही पाहायला गेल्यास शिक्षणाचा आणि कर्तृत्वाचा फारसा संबंध नाही, याची असंख्य उदाहरणे सांगता येतील. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ज्यांचे नाव कधीकाळी घेतले गेले, असे धीरूभाई अंबानी हे मॅट्रिकही पास नव्हते. खासगी इंजिनिरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊन परप्रांतात जाणार्‍या मराठी विद्यार्थ्यांना आपल्याच राज्यात संधी देणारे वसंतदादा पाटील हे माजी मुख्यमंत्री जेमतेम चौथी पास होते. आजही प्रशासनावर पकड हा विषय आला की, दादांचे नाव निघते. आपल्या हाताखाली राबणार्‍या आणि शासनाचा रथ ओढणार्‍या आयएस, आयपीएस अधिकार्‍यांवर त्यांचा चांगलाच वचक होता आणि त्यांच्या काळामध्ये अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले.

पीएच.डी.च काय, कोणतेही शिक्षण घेतले तरी ती व्यक्ती काय दिवे लावणार आहे, हे त्या व्यक्तीच्या एकंदर व्यक्तिमत्त्वावर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. हे विधान सामाजिक, राजकीय आणि उद्योजक क्षेत्रामध्ये सर्वत्र लागू पडते. आपल्या राज्यापुरते बोलायचे झाले, तर पीएच.डी.चे शिक्षण हे बहुतांश वेळेला अध्यापन क्षेत्रात येणार्‍या किंवा येऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचा विषय असते. बर्‍याचदा अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत करत पीएच.डी. पूर्ण करतात. उद्देश दुहेरी असतो, म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळाले तर किमान कुठे ना कुठेतरी प्राध्यापक म्हणून नोकरी लागेल, याची शक्यता असते. नेट, सेट या अवघड परीक्षांना बगल देऊन पीएच.डी.चा प्रशस्त मार्ग निवडला जातो. जे प्राध्यापक म्हणून लागलेले असतात, त्यांनी पीएच.डी. केली तर त्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढी मिळतात. पीएच.डी. हा जबाबदारीने करण्याचा विषय असून, त्याचे महत्त्व आहेच! पीएच.डी. ही शिक्षणातील सर्वोच्च डिग्री आहे आणि ती मिळावी, अशी आकांक्षा प्रत्येकाला असणे यात काही वाईट नाही; परंतु पीएच.डी. करून काही दिवे लावता येतील किंवा नाही किंवा पीएच.डी. नाही केली तर काही बिघडेल, अशी काही शक्यता सांप्रतकाळी दिसत नाही.

संबंधित बातम्या

बर्‍याचदा आपण असे पाहतो की, शालेय शिक्षण अर्धवट सोडलेले किंवा वर्गामध्ये शेवटच्या बाकावर बसणारे विद्यार्थीपण पुढील आयुष्यात देदीप्यमान अशी कामगिरी करत असतात. या नापास होणार्‍या किंवा शैक्षणिक यश प्राप्त न करू शकणार्‍या विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात फार मोठे यश मिळवले, तर त्यांचे शिक्षक आणि सोबत शिकणारे वर्गबंधू चकित होत असतात. जे काय शिक्षण झाले असेल ते घेऊन जर प्रत्येक मराठी माणसाने ‘आपापल्या क्षेत्रात आपापला दिवा’ उंचावर नेऊन ठेवला तरी राज्य झपाट्याने प्रगती करायला सुरुवात करेल.

– बोलबच्चन

Back to top button