महात्मा फुले यांचे शेती धोरण | पुढारी

महात्मा फुले यांचे शेती धोरण

विठ्ठल वळसे-पाटील

कन्हेरीच्या मुळ्या वाटून प्याल्यास कर्तीधर्ती मुले आपली कशीतरी पोटे भरतील. परंतु माझ्या जन्म देणार्‍या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहानसहान चिटकुल्या लेकरांस अशा वेळी कोण सांभाळील? त्यांनी कोणाच्या दारात उभे राहावे? त्यांनी कोणापाशी आपले तोंड पसरावे? शेतकर्‍यांच्या दु:खाची परिसीमा महात्मा फुले मांडतात. मागे पहिले तर शेती पारंपरिक पदतीने केली जात होती. या कारणाने शेती विकास मोठ्या प्रमाणात होत नसे.

गावोगावी जाऊन ‘शेतकर्‍याचा आसूड’ हे पुस्तक असे जाहीरपणे चावडीवर अक्षराची ओळख नसणार्‍या स्त्री-पुरुषांसमोर वाचन होऊ लागले. शेतकर्‍यांची उपासमार, कर्ज व त्यातून होणारी आत्महत्या या गोष्टी ब्रिटिशांसमोर मांडल्याने सरकारला अनेक शेतीविषयक योजना आखाव्या लागल्या. महात्मा फुले यांनी शेतकर्‍यांची दैना दुष्काळ पडल्यावर कशी होते, तर चांगला माल निघाल्यावर व्यापारी, दलाल कसे लूटमार करतात याची उत्तम उदाहरणे देऊन सरकारला ठिकाणावर आणण्याचे काम केले. महात्मा जोतिराव फुले हे शेतकर्‍यांचे अज्ञान हेच सावकार, भांडवलदार व व्यापारी वर्गाचे भांडवल आहे, हे 18 व्या शतकात ओळखणारे युगपुरुष होत. त्यांनी ‘शेतकर्‍याचा आसूड’ या ग्रंथातून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. ब्रिटिश सरकारकडे शेतकर्‍यांच्या मागण्या मांडल्या तर काही मागण्या मान्य कराव्या लागल्या.

आजची शेती व शेतकरी यांची अवस्था पाहता फुले यांच्या शेतीविषयीच्या ध्येय-धोरणांचा अवलंब करणे काळाची गरज ठरणार आहे. शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे, मागास वर्ग, महिला, शोषित, बहुजनांचे दुबळेपण कशात आहे तर ते शिक्षणाचा अभाव, अज्ञान व अंधश्रद्धा यात आहे. याचे विवेचन महात्मा फुले यांनी मांडले. ब्रिटिश काळात भारताचे जीवनमान हे शेतीवर आधारित होते. यावेळी सावकार, मारवाडी, ब्राह्मण व ब्रिटिश सरकार कसे छळ करत होते, यावर फुले यांनी भडीमार केला. शेतकरी वर्गात मुलांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने त्यांना गुंतवून ठेवले जाते. अनेकदा अंगावरचे दागदागिने मोडून अन्नधान्य व जनावरांचा चारा घ्यावा लागत अस.े तरीही उपासमारी शिल्लक राहात होती. त्यात शेती हाच पर्याय राहतो. जोडधंद्याचे ज्ञान नाही. दुष्काळी परिस्थितीत सिंचनाची साधने जुनी म्हणजे मोट, त्यावर शेती मोठ्या प्रमाणात होत नसे.

बैल व शेती अवजारे खरेदीस पैसे शिल्लक राहात नसत. त्यामुळे अनेक प्रकारे पिळवणुकीचा सामना करावा लागत असे. घरात करता पुरुष जावो किंवा मोठे कार्य केल्याने पैसा संपला असला तरी शेतसारा न चुकता भरावा लागत असे. जोडधंदा नाही. त्यात दरवर्षी शेतीवर सावकाराचे किंवा मारवाड्याचे कर्ज घेतलेले असे. परतफेड व्याजासह न झाल्यास जप्ती. यातून कुटुंबाची त्रेधातिरपिट होत असे. शेत बांधावरून भांडणे, सरकारी कचेरीत वकील, कारकुनांकडून शेतकरी लुटला जात असे. त्याचे परदेशी जाऊन उद्योग, व्यवसाय करण्याचे शिक्षण नाही. हुन्नर नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष शेतकरी शिक्षणाअभावी व अंधश्रद्धेपोटी तो गुलामच राहिला. शेतकर्‍याचा आसूड ग्रंथातून शेतकरी व शेती यांची परखड चिकित्सा फुले यांनी मांडली आहे.

महात्मा फुले यांनी शेती विकासाबाबत काही उपाय सुचवले. पूर्वी शेती ही पारंपरिक पद्धतीने व निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे धान्य उत्पादन कमी होत असे. परिणामी दुष्काळ आल्यास धान्यसाठा संपलेला असे. अशावेळी आधुनिक पद्धतीने शेती व तिचे आधुनिकीकरण करावे, वृक्षतोड थांबवावी, केवळ पावसावर अवलंबून न राहता आधुनिक उपकरणांचा वापर करावा. तळी, तलाव, धरणे व कालवे बांधावेत. दुष्काळात शेतकर्‍यांना कमी व्याज दराने कर्ज द्यावे. कालव्याचे पाणी नळावाटे द्यावे. त्यामुळे जास्त पाणी मिळणे सोपे होईल. पूर्वी वीज नसल्याने वन्य प्राणी व डुकरे यांचा मोठ्या प्रमाणात शेतमालाला उपद्रव होत असे. रात्रीची राखण करावी लागत असे. हे उपद्रव टाळण्यासाठी शेतकर्‍यांना गावठी बंदुका द्याव्यात व परवानगी द्यावी. शेतकर्‍यांच्या शेताच्या नुकसानीबाबत सरकारच्या तिजोरीतून अथवा पोलिस अंमलदाराच्या पगारातून नुकसान भरून देण्याबाबत कायदा करावा, अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली होती. त्यामुळे शेतकरी सुखाची झोप घेईल असे त्यांचे मत होते.

Back to top button