भगवान महावीरांचा कल्याणमार्ग! | पुढारी

भगवान महावीरांचा कल्याणमार्ग!

प्रा. डॉ. विजय ककडे

भगवान महावीरांच्या महानिर्वाणास 2050 वर्षांचा कालखंड झाला असून त्यांचा मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आजही तितकाच उपयुक्त असल्याचे दिसते. अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांत विचार या तत्त्वत्तयीमार्गे त्यांनी स्पष्ट केलेले भेदविज्ञान महत्त्वाचे आहे. त्याचे मूलसूत्र समजून घेतल्यास वैयक्तिक व राष्ट्रीय स्तरावरही मंगलमय जीवनापद्धती निर्माण करता येते.

गेल्या पाच हजार वर्षांचा इतिहास तपासला, तर साधारणपणे प्रत्येक 3 दिवसांमागे आपण एक युद्ध करीत आहोत. युद्ध नसते तेव्हा युद्धाची तयारी सुरू असते. महत्त्वाचे म्हणजे युद्धाचे कारण किंवा उद्दिष्ट ‘शांतता’ प्रस्थापित करणे हेच असते. फक्त आमच्या अटीनुसार शांतता होत नाही एवढ्यासाठी युद्धे होतात. प्रचंड आकार व साधनसंपत्ती असणार्‍या रशियाला युक्रेनचा या युद्ध मानसिकतेत, हिंसक प्रवृत्तीत बदल एकदम होणार नाही. त्यासाठी भगवान महावीर, गौतमबुद्धांनी दिलेली विचारधारा, जीवनपद्धती स्वीकारली, तरच मानवजातीचे अस्तित्व टिकेल. महाविनाशाच्या उंबरठ्यावरून परतणे अथवा पूर्ण विनाश स्वीकारणे हे दोनच पर्याय समोर असून आपण दुसर्‍या पर्यायाकडे वेगाने वाटचाल करीत आहोत. जे आपले कधीच नव्हते व पुढे असणार नाही, त्याला आपलेच समजून कामात राहणे व जे आपले कायमस्वरूपी आहे त्याकडे दुर्लक्ष करणे हीच खरी शोकांतिका आहे.

आपले शाश्वत, चिरंतन जे आहे ते व विनाशी भ्रमित साथ यातील भेद जाणणे व तसे आचरणात आणणे आपली दिनचर्या तशी करणे हे भेदविज्ञान आहे. प्रत्येक वस्तूवर व त्याहीपुढे व्यक्तीवर, समाजावर मालकी प्रस्थापित करण्याचा हव्यास परिग्रहास जन्म देतो. ती वस्तू, व्यक्ती, समाज आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी हिंसा अपरिहार्यपणे पाठोपाठ येते. यातून सुरू होणारे दुष्टचक्र. विषमता, अन्याय व विध्वंस या वाटेने पुढे चालत राहतो. जगातील सर्व साधनसंपत्ती सर्व प्राणिमात्राच्या, मनुष्याच्या गरजा पूर्ण करता येथील एवढ्या आहेत; परंतु कोणत्याही एका व्यक्तीच्या हव्यासाची पूर्तता करू शकत नाही, हे न समजण्याचे कारण आपण वस्तू, संपत्ती, घर, जमीन यांना आपलेच समजतो. खरे तर, ते आपणापूर्वी होते, आपणानंतरही राहणार. आपण फक्त तात्पुरते वाहक आहोत हे भेद विसरल्याने, हा विवेक नसल्याने सर्व हिंसा, शोषण जन्मास येते. याबाबत केवळ वैचारिक, सैद्धांतिक जाण पुरेशी नाही तर तसे आचरण हवे, यावर भ. महावीरांनी भर दिला.

महावीर त्यागी होते. यापेक्षा ते ज्ञानी होते, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्याग करणे यामध्येच वस्तूची मालकी गृहीत आहे. वस्तूंच्या त्याग, पूजा-पाठ ही सुरूवात प्रामुख्याने हे माझे नाही, मी साक्षी असणे महत्त्वाचे ठरते. वस्तूंचा मोह सुटणे आणि सोडणे यातील फरक समजून घेणे हे भेदविज्ञान आहे. क्षुद्र, कमी महत्त्वाचे सोडावे लागत नाही, त्याग करावा लागत नाही. ओंजळीमध्ये असणारे रंगीत दगड टाकून हिरे घेताना आपण त्याग करत नाही. वस्तूंचे ममत्व संपून माझे कायमस्वरूपी आत्मतत्त्व स्पष्ट होते तेव्हा हे शरीरदेखील माझे नाही. शरीर माझे समजले हाही भ्रम होता. त्या भ्रमाचे विसर्जन हीच ‘केवली’ अवस्था महावीरांनी प्राप्त केली. ‘तुम्ही मला शरण या, मी तुम्हाला मुक्ती देतो’ ही शरण संस्कृती महावीरांनी व समस्त जैन परंपरेने नाकारली व मी प्रयत्न करेन, माझा उद्धार इतर कोणी करूच शकणार नाही, हा प्रवास स्वतः करावयाचा आहे. तेथे कोणाचा आधार नाही ही स्वतंत्र वाटचाल करण्यात भेदविज्ञान महत्त्वाचे ठरते. कोणाची तरी वाट पाहत बसणे, उद्धारकर्ता येईल ही शरणागत मानसिकता न घेता आत्मतत्त्वाचा शोध घेत, मिथ्यातत्त्व सोडत, आंधळेपणाचा त्याग करीत डोळसपणे केवली अवस्थेकडे, निर्वाणावस्था प्राप्त करणारे महावीर आचरणावर भर देतात.

Back to top button