भरारी : १०७ कोटींची ऑफर धुडकावणारा अवलिया | पुढारी

भरारी : १०७ कोटींची ऑफर धुडकावणारा अवलिया

देविदास

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे एक जगप्रसिद्ध वाक्य विज्ञानाचे बहुतांश प्राध्यापक अध्यापनावेळी विद्यार्थ्यांना ऐकवत असतात,
‘I have no special talent. I am only passionately curious.’ या वाक्याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यामागचा हेतू हा की, जन्मजात बुद्धिमान विद्यार्थी हे पुढे महान व्यक्ती बनतात असे नव्हे, तर सामान्य बुद्धिमत्ता लाभलेली मुलेही ज्ञान संपादनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करतात. गोरखपूरचा फैजल खान हा तरुण शिक्षक त्यापैकीच एक. देशभरातील विद्यार्थी त्यांना आदराने ‘खान सर’ म्हणतात आणि 1 कोटी 45 लाख स्पर्धा परीक्षा उमेदवार शिक्षण तंत्राला फॉलो करतात.

‘कौन बनेगा करोडपती’ खेळताना अमिताभ बच्चन यांनी फैजल खान यांना प्रश्न विचारला, ‘देश के युवा, नौजवान आपके सरल और आसान शिक्षातंत्र के कायल क्यू है?’ यावर खान यांनी सांगितले, ‘तुम्ही इलेक्ट्रॉन, मी न्यूट्रॉन आणि माझ्या बाजूचा हा सहकारी प्रोटॉन! तुम्ही इलेक्ट्रॉन आम्हाला ताकदीने आपल्याकडे कितीही खेचण्याचा प्रयत्न करा, आम्ही तुमच्याकडे ओढले जाणार नाही. उलट आम्ही (प्रोटॉन आणि न्यूट्रॉन) तुम्हाला आमच्याकडे खेचणार! एकमेकांना खेचण्याची अणुंची ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील; परंतु कुणीच कुणाला एकमेकांकडे खेचू शकणार नाही.’ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचे कक्षेतील भ्रमण  कितीही अवघड विषय असू दे, तो सोपा करून समजवून सांगणे यात खान यांची हातोटी आहे.

‘तुम्ही शिकविलेले विद्यार्थ्यांना लक्षात कसे राहते?’ या बच्चन यांच्या प्रश्नावर खान छातीठोकपणे सांगतात, ‘मी शिकविलेले विद्यार्थ्यांनी विसरून दाखवावे.’ फैजल खान हे देशातील टॉप टेन शिक्षकांमध्ये नंबर दोनचे शैलीदार शिक्षक आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे 1993 च्या डिसेंबरमध्ये फैजल खान यांचा जन्म झाला. खान यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण उत्तर प्रदेशातील देवरिया येथील परमार मिशन स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय लष्करात करिअर करायचे ठरवले. मात्र त्यांच्या एका हातात व्यंग असल्याने एनडीए परीक्षेत अपयश आहे. त्यानंतर त्यांनी एआयईईई या राष्ट्रीय परीक्षेची जोरात तयारी सुरू केली. पण ऐन परीक्षेच्या दिवशी हे महाशय रात्रभर जागत अभ्यास करत होते आणि झोप केव्हा लागली, हे त्यांना कळलेच नाही. जेव्हा उठले तेव्हा परीक्षेची वेळ संपली होती. फैजल यांनी अलाहाबाद विद्यापीठात सायन्समध्ये बी.एस्सी. आणि त्यानंतर एम.एस्सी. पदवी मिळविली अन् भूगोलात एम.ए. केले.

उत्तर प्रदेशात शिक्षण घेतल्यानंतर, करिअरसाठी पाटणा येथे खान यांनी स्पर्धा परीक्षांचे कोचिंग क्लासेस सुरू केले. सुरुवातीला फैजल यांच्या कोचिंगला जेमतेम 6 विद्यार्थी असत. परंतु शैलीदार शिकवणीमुळे ही संख्या 150 पर्यंत वाढली. 2020 मध्ये कोरोना महामारीनंतर खान यांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले. खान जीएस रिसर्च सेंटर हे या अकादमीचे नाव. या क्लासेसला एकाचवेळी दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी कोचिंग घेतात. खान यांनी अकादमीच्या नावाने यू-ट्यूब चॅनल सुरू केले. हे अ‍ॅप आणि यू-ट्यूब चॅनलवर खान करंट अफेयर्स, जनरल नॉलेज, विज्ञानाचे वेगवेगळे अवघड विषय गंमतीशीर पद्धतीने सोपे करून सांगतात.  विद्यार्थ्याकडून एका विषयाचे ते केवळ 200 रुपये घेतात. त्यामुळे देशभरातील दीड कोटी विद्यार्थी त्यांचे कोचिंग घेत आहेत. एवढ्या कमी पैशात अभियांत्रिकी आणि स्पर्धा परीक्षांचे कोचिंग मिळत असल्याने, देशातील इतर प्रसिद्ध कोचिंग घराण्यांचे धाबे दणाणले. यापैकी एका संस्थेने खान सरांना 107 कोटींची ऑफर दिली. पण ती खान यांनी धुडकावून लावली. ‘107 कोटींची ऑफर नाकारल्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप होत नाही का?’ या अमिताभ यांच्या प्रश्नावर खान यांनी दिलेले उत्तर सर्वांनाच अंतर्मुख करणारे आहे. ‘107 कोटींमध्ये मी विकला गेलो असतो तर माझ्या नावानेच त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंनी वाढली असती आणि विद्यार्थ्यांना नाममात्र 200 रुपये आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचा माझा मार्ग बंद झाला असता.’ फैजल नावाच्या या अवलियाने गावखेड्यातील कित्येक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवल्याने कोणी पोलिस अधिकारी, कोणी वनाधिकारी, तर कोणी प्रांत अधिकारी बनले आहेत. यात गरीब मुलींची संख्या जास्त आहे. स्वस्तात शिक्षण देऊन देशाच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवायचा आहे, असा निर्धार खान यांनी केला आहे.

Back to top button