सौरऊर्जेतील प्रकाशवाटा | पुढारी

सौरऊर्जेतील प्रकाशवाटा

- मिथिला शौचे

मध्य प्रदेशातील सांची शहर मौर्यकाळातील बौद्ध स्तूपसाठी ओळखले जाते. युनेस्कोने सांचीतील महास्तूपला जागतिक वारसा म्हणून जाहीर केले आहे. आता सांची शहराची आणखी एक नवीन ओळख प्रस्थापित झाली आहे. यानुसार सांची आता देशातील पहिले सौर शहर म्हणजे ‘सोलर सिटी’ म्हणून नावारूपास आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी अलीकडेच सांची सोलर सिटीचे लोकार्पण केले. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांचीकडे देशासाठी आदर्श उदाहरण म्हणून पाहता येईल.
सध्याच्या काळात जागतिक हवामान बदल, प्रदूषण, पाण्याचे नैसर्गिक स्रोत संपत चालल्याने वीज निर्मितीवर होणारा परिणाम हे गंभीर प्रश्न जगाला भेडसावत आहेत. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी भारतासह जगभरात जीवाश्म इंधनांचा वापर संपवण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु, आजही भारतातील बहुतांश औष्णिक विद्युत केंद्रांमधील वीज कोळशापासून निर्माण होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यायी ऊर्जानिर्मितीत महत्त्वाचा स्रोत ठरला आहे, तो म्हणजे सौर ऊर्जा! आपल्या देशातही सरकार वीजनिर्मितीसाठी पर्यायी स्रोतांनाही प्रोत्साहन देत आहे. यामध्ये सौरऊर्जा प्रमुख आहे. देशभरात अनेक ठिकाणी सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभे राहत आहेत. आगामी काळात भारतात अनेक शहरे सौरऊर्जा तंत्राचा अंगीकार करतील, असेही  म्हटले जात आहे.
सांचीजवळील नागौरी भागात सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. तेथील मोकळ्या, विस्तीर्ण भागात सोलर पॅनेल दिसतात. या माध्यमातून तीन मेगावॅट वीज तयार होऊ शकते. सांचीतील रेल्वे स्थानक, सरकारी कार्यालये, शाळा, पोस्ट ऑफिस आदी इमारतींच्या गच्चीवर सोलर पॅनेल दिसतात. तेथील रस्त्यावरचे दिवेदेखील सौर ऊर्जेवरच प्रकाशमान होत आहेत. सांचीतील सुमारे दहा हजार नागरिकांनीदेखील सोलर लॅम्पचा वापर करण्याचा संकल्प केला आहे.
शहरातील अनेक घरांच्या गच्चीवर सोलर पॅनेल बसविण्यात येत असून त्यातून सुमारे 63 किलोवॅट विजेचे उत्पादन होऊ शकते. सांची शहराची  शंभर टक्के गरज ही सौरऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण व्हावी, यासाठीही प्रकल्पावर काम केले जात आहे. या विजेचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी म्हणजेच सिंचन, मोटर पंप आदींसाठी केला जाईल. या दोन्ही सौर प्रकल्पांतून तयार होणार्‍या आठ मेगावॅट विजेमुळे सांची शहर पूर्णपणे आत्मनिर्भर राहू शकते. आयआयटी कानपूरच्या मदतीने सांचीला सोलर सिटी करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
केंद्रशासित प्रदेश असणारे दीवही गेल्या काही वर्षांपासून दररोज शंभर टक्के सौरऊर्जेवर चालत आहे. गेल्या सात वर्षांपासून या शहराला दिवसा सौरऊर्जा पुरवली जात आहे. सुमारे दोन सौर उद्याने आणि 112 सरकारी संस्थांच्या छतांवरील सौर प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज संपूर्ण शहराच्या दिवसातील ऊर्जेची गरज भागवत आहे. आज या 42 चौरस किलोमीटरच्या शहरात सुमारे 7 मेगावॅटची मागणी आहे. सर्व घरे, वातानुकूलित रिसॉर्टस्, 60 बेडचे हॉस्पिटल, एअर कंडिशन असलेली सर्व सरकारी, बिगर सरकारी कार्यालये, आईस्क्रीम कारखाने, फिश वेअरहाऊस हे सगळे दीवमध्ये दिवसभर सौरऊर्जेवर चालतात. प्रत्यक्षात सौरऊर्जेवर गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चा होत आहे. मात्र, देशातील बहुतांश भागात आणि नागरिक अजूनही सौरऊर्जेच्या व्यापक वापराचे आकलन करताना दिसून येत नाही. आता किरकोळ स्वरूपात कोठे सरकारी कार्यालयाच्या गच्चीवर, तर कोठे एखाद्या बंगल्यावर सोलर पॅनेल दिसतात; मात्र काळानुसार सौरऊर्जेतून वीज क्षेत्रात क्रांती घडवून आणता येणे शक्य आहे. यासाठी सांचीचे उदाहरण घेता येईल. सांचीचा आदर्श घेत देशातील अन्य भागांचे, शहराचे चित्र बदलेल अशी आशा व्यक्त करता येईल. सध्याच्या काळात हवामान बदलाशी सामना करताना अनेक देशांबरोसह भारतानेही कोळसा, तेल यासारख्या पारंपरिक इंधनांचा वापर करणे कमी केले आहे आणि तसा संकल्पही केला आहे. अर्थात, हा संकल्प तडीस नेण्यासाठी सौरऊर्जेचा वापर, हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Back to top button