तूर्त 'इन्स्टिट्यूट फॉर वॉटर, एन्व्हॉयरमेंट अँड हेल्थ'च्या माध्यमातून जारी केलेल्या अहवालात म्हटले की, 2050 पर्यंत बहुतांश लोकसंख्या ही मोठ्या धरणांच्या पायथ्याशी वास्तव्य करत असेल. पैकी बहुतांश धरणांनी वय पूर्ण केलेले असेल. साहजिकच, ही धरणे फुटण्याचा धोका आपल्या डोक्यावर कायमच राहणार आहे. प्रश्न केवळ 50-100 धरणांपुरता मर्यादित नाही. संपूर्ण जगात एकूण 58 हजार 700 धरणे असून, त्यापैकी बहुतांश धरणे ही 1930 ते 1970 या काळात बांधलेली आहेत. बांधकाम करताना त्यांचे वय 50 ते 100 वर्षे असेच गृहीत धरले आहे. 50 वर्षांनंतर काळाच्या ओघात सिमेंटपासून बांधलेली मोठी धरणे जीर्ण होऊ लागतात. आजघडीला जगभरातील एकूण धरणांपैकी 55 टक्के धरणे ही केवळ चार आशियाई देशांत आहेत. चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया. या देशांत बांधलेल्या धरणांपैकी बहुतांश धरणे 50 वर्षे पूर्ण करण्याच्या काठावर आहेत. एकट्या चीनमध्येच 23 हजार 811 धरणे असून, ही संख्या जगातील एकूण धरणांच्या 40 टक्के आहे.