G20 summit in India: जी-20: मानवकेंद्रित विकासाच्या दिशेने वाटचाल | पुढारी

G20 summit in India: जी-20: मानवकेंद्रित विकासाच्या दिशेने वाटचाल

‘वसुधैव कुटुंबकम’ या दोन शब्दांमध्ये सखोल तत्त्वज्ञान सामावलेले आहे. याचा अर्थ आहे, ‘हे जग म्हणजे एक कुटुंब आहे.’ हा एक सर्वसमावेशक विचार आहे; जो आपल्याला सीमा, भाषा आणि विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन एक सार्वत्रिक कुटुंब म्हणून प्रगती करण्यासाठी प्रेरित करतो. भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या काळात याचे रूपांतर मानवकेंद्री विकासाच्या आवाहनात झाले आहे. एक कुटुंब म्हणून आपण परस्परांना विकासासाठी पाठबळ देत आहोत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 परिषद दिल्लीत होत आहे. त्यानिमित्ताने….

जगातील देशांची सध्याची स्थिती कोरोना महामारीपूर्व काळापेक्षा खूपच वेगळी आहे. यामध्ये अन्य बदलांबरोबरच तीन महत्त्वाचे बदल झाले आहेत. सर्वात पहिला बदल म्हणजे आता जगाच्या जीडीपीकेंद्रित द़ृष्टिकोनापेक्षा मानवकेंद्रित द़ृष्टिकोनाकडे वळण्याची गरज असल्याची भावना वाढीला लागत आहे. दुसरा बदल म्हणजे जागतिक पुरवठा साखळीच्या चिवटपणाचे आणि विश्वासार्हतेचे महत्त्व जगाला पटू लागले आहे. तिसरा बदल म्हणजे जागतिक संस्थांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून बहुपक्षवादाला चालना देण्याचा सामूहिक सूर व्यक्त होऊ लागला आहे. या सर्व बदलांमध्ये जी-20 अध्यक्षतेने एका उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे.

डिसेंबर 2022 मध्ये ज्यावेळी आम्ही इंडोनेशियाकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तेव्हा मी लिहिले होते की, मानसिकतेमधील बदलाला जी-20 ने चालना देण्याची गरज आहे. ग्लोबल साऊथ आणि आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्यासंदर्भात याची विशेषत्वाने गरज होती. 125 देशांचा सहभाग असलेल्या ग्लोबल साऊथ शिखर परिषदेमधून घुमलेला आवाज, हा आमच्या जी-20 अध्यक्षतेखालील उपक्रमांमधील एक महत्त्वाचा उपक्रम होता. ग्लोबल साऊथ देशांचे अभिप्राय आणि त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार जाणून घेण्याच्या द़ृष्टीने हा एक महत्त्वाचा उपक्रम होता.

संबंधित बातम्या

तसेच भारताच्या अध्यक्षतेच्या कालावधीत जी-20 मध्ये आफ्रिकी देशांकडून आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला. एवढेच नव्हे, तर आफ्रिकी संघातील देशांचा जी-20 चे स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याची मागणीदेखील अधिक ठामपणे मांडण्यात आली. एकमेकांशी जोडले गेलेले जग म्हणजे विविध क्षेत्रांतील आव्हानेही एकमेकांशी जोडलेले आहे. 2030 साठीच्या कार्यक्रमपत्रिकेतील उद्दिष्टांचा अर्धा प्रवास पूर्ण करण्याचे हे वर्ष आहे आणि अनेकांना अशी चिंता सतावते आहे की, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (एसडीजी) प्रगतीचा मार्ग काहीसा भरकटला आहे. एसडीजी साध्य करण्याच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठीची जी-20 कृती योजना यापुढील काळात एसडीजीच्या अंमलबजावणीच्या दिशेने जी-20 ची दिशा निश्चित करेल.

भारतात निसर्गाशी एकरूप होऊन जगणे ही प्राचीन काळापासूनची सामान्य जीवनपद्धती आहे आणि आधुनिक काळातही हवामान बदलविषयक कृतीमधील योगदानाचा आपला वाटा उचलत आहोत. ग्लोबल साऊथमधील अनेक देश सध्या विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि म्हणूनच हवामान बदलविषयक कृती त्यांना राबविण्यासाठी अनुकूल असली पाहिजे. हवामान बदलविषयक कृतीच्या आकांक्षा हवामान बदलविषयक अर्थ पुरवठा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण यांच्या कृतीशी जुळल्या पाहिजेत.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय करायला नको याबाबतीतील निव्वळ निर्बंधात्मक वृत्तीपासून दूर जाऊन, काय केले पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करून अधिक रचनात्मक वृत्ती स्वीकारण्याची गरज आहे, यावर विश्वास आहे. शाश्वत तसेच लवचीक अर्थव्यवस्थेसाठी चेन्नई एचएलपीएसमध्ये महासागर अधिक निरोगी राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या अध्यक्षतेतून हरित हायड्रोजन नवोन्मेष केंद्रासह स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठीची जागतिक परिसंस्था उदयाला येईल.

हवामान बदलविषयक कृतीचे लोकशाहीकरण करणे, हा चळवळीला गती देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्याप्रमाणे व्यक्ती दीर्घकालीन आरोग्याचा विचार करून दैनंदिन निर्णय घेतात, त्याचप्रमाणे ग्रहाच्या दीर्घकालीन आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा विचार करून ते जीवनशैलीचे निर्णय घेऊ शकतात. ज्याप्रमाणे निरामयतेसाठी योग एक जागतिक लोकचळवळ झाली आहे, त्याचप्रमाणे आपण शाश्वत पर्यावरणासाठी जीवनशैलीने जगाला प्रेरित केले आहे. हवामान बदलाच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वपूर्ण ठरते. भरडधान्ये किंवा श्री अन्न, क्लायमेट-स्मार्ट शेतीला चालना देत यासाठी साहाय्यकारी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षात, भरडधान्यांना भारताने जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.

तंत्रज्ञान सर्वसमावेशक बनवायला हवे. भूतकाळात तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना मिळालेले नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर विषमता रुंदावण्याऐवजी त्या कमी करण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो, हे भारताने गेल्या काही वर्षांमध्ये दाखवून दिले आहे. उदाहरणार्थ, जगभरातील अब्जावधी लोक जे बँक सेवेपासून वंचित राहतात किंवा ज्यांना डिजिटल ओळख नसते, अशा लोकांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेद्वारे वित्तीय समावेशन करणे शक्य आहे.

भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, हा योगायोग नाही. आपल्या मोठा आवाका असलेल्या आणि शाश्वत उपायांनी समाजाच्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकाला विकासाची गाथा पुढे नेण्यासाठी सक्षम केले आहे. अवकाश क्षेत्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते उद्योजकतेपर्यंत, भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत लिंग आधारित डिजिटल तफावत दूर करण्याचा, कामगारांच्या सहभागामधील तफावत कमी करण्याचा आणि महिलांचा नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतासाठी जी-20 अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल म्हणून आम्ही या अनुभवाची कवाडे जगासाठी खुली केली आहेत.

 

Back to top button