बळीराजा इडा, पीडा टळो! | पुढारी

बळीराजा इडा, पीडा टळो!

आज बलिप्रतिपदा. दिवाळी पाडवा. साडेतीन मुहूर्तांतील एक अत्यंत शुभमुहूर्त. नववर्षाचा शुभारंभ करणारा हा सण. सम्राट विक्रमादित्याने याच दिवशी नूतन संवत्सर सुरू केले. एकविसाव्या शतकातही हा संवत्सर नित्य व्यवहारात आहे. व्यापारीवर्गाला जसे आजच्या दिवसाचे महत्त्व, तसे सर्वसामान्य जनतेच्या जीवनातही या मंगल दिवसाचे महत्त्व आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन याप्रमाणे दीपोत्सवातील दिवाळी पाडवा हाही चैतन्याचा, नवी ऊर्जा देणारा दिवस आहे. अनेक शुभ संकल्प या मुहूर्तावर वास्तवात येतात. मुळातच या काळात सृष्टीचे आनंदवैभव ओसंडत असते. धन-धान्याची समृद्धी झालेली असते. बळीराजाच्या घरी धान्यलक्ष्मीचे शुभागमन झालेले असते. ‘आमोद सुनासी आले’ असा सारा माहोल असतो. सामान्यांच्या आयुष्यात आनंद, हर्षाचे क्षण मुळातच अत्यल्प असतात. त्यामुळेच दिवाळीचा हा उल्हास त्यांच्यासाठी आनंदनिधानच ठरत असते.रावणाचा पराभव करून श्री रामचंद्र अयोध्येला परतले आणि याच दिवशी त्यांचा राज्याभिषेक झाला. रामराज्याची द्वाही फिरली. रामराज्याची, सुखी, समाधानी राज्याची ही संकल्पना एकविसाव्या शतकातही सर्वसामान्यांच्या मनात द‍ृढ आहे आणि या संकल्पनेचे आकर्षण ओसरलेले नाही. आपली भारतीय परंपरा कशी सत्प्रवृत्त आणि अविनाशी आहे, याचे हे एक द्योतक म्हटले पाहिजे. पाश्‍चिमात्य चंगळवादाच्या पार्श्‍वभूमीवर आपली भारतीय परंपरा आणि संस्कृती आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याने स्वयंभू उभी राहिली आहे. दीपोत्सवातील बलिप्रतिपदेला असा महान सांस्कृतिक वारसा आहे. ज्या नावाने ही कार्तिक शुद्ध प्रतिपदा प्रसिद्ध आहे, तो बळीराजा हा महान सम्राट होता. तो राक्षस राजा असला, तरी त्याचे सद‍्गुण लोकोत्तर होते, अशीच सार्‍या पुराणांची साक्ष आहे. या बळीराजाच्या अपार पुण्याईमुळे देव चिंतेत पडले. तेव्हा भगवान विष्णूंनी बळीराजाकडे वामनरूपात येऊन तीन पावले भूमीचे दान मागितले. बळीराजा मोठा दानशूर होता. त्याने क्षणही न गमावता हे भूमीदान दिले. बळीराजाला पाताळात जावे लागले; पण या राजाचे पुण्य एवढे की, भगवान विष्णू त्याच्या निवासस्थानी द्वारपाल होऊन राहिले. बळीराजा आपल्या संस्कृतीत अजरामर होऊन राहिला आहे. बळीराजाचे राज्य हे सर्वसामान्यांना न्याय देणारे होते, तसा त्याचा महिमा होता. त्याच्या या महिम्याचे आजही स्मरण होते आणि बहुजन समाजात बलिप्रतिपदेला ‘इडा, पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी मन:पूर्वक प्रार्थना केली जाते. शतके लोटली; पण या प्रार्थनेचे आणि बळीराजाचे माहात्म्य अणूभरही उणावलेले नाही. बळीराजा हा शेतकर्‍यांचा, रयतेचा राजा होता. म्हणूनच शेतकर्‍यांना बळीराजा म्हटले जाते. या राजाची महती समाजपुरुषाच्या अंत:करणात किती खोलवर रुजली आहे, हेच त्यावरून दिसून येते.

आपल्या भारतीय संस्कृतीचे अशा आदर्श पुरुषोत्तमांच्या प्रतिमा समाजापुढे उभ्या केल्या आहेत. समाजाने सत्यमार्गाने चालावे, ही त्यामागील धारणा. दिल्या शब्दाला जागावे, ही शिकवण. परपीडन होऊ नये, हा आपला संस्कृतीचा संदेश. ही सारी विचारधारा वेगवेगळ्या सणांद्वारे प्रकट होतच असते. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन, यासाठी वटपौर्णिमेपासून नागपंचमी अशा सणांची योजना पूर्वसुरींनी केली आहे. अशा प्रत्येक सणातून आदर्श जीवनपद्धती, निसर्गाशी समन्वय राखण्याचा विचार मांडलेला आढळून येतो. दीपोत्सवाच्या सणामध्ये तर अशा अनेक आदर्शांचे पूजन केल्याचे दिसून येते. आरोग्य, धनसंपदा, दाम्पत्य सौख्य, बंधु-भगिनीचा स्नेहभाव, कौटुंबिक सौहार्द, स्नेहीजनांचे मैत्र याबरोबर या दीपोत्सवात सामाजिक स्वास्थ्याचेही संवर्धन होत असते. चैतन्य आणि मांगल्याबरोबरच अंधारातून ज्ञानमय प्रकाशाकडे जाण्याचा शुभसंदेश देणारा हा दीपोत्सव म्हणूनच सार्‍या सणांचा राजा म्हणून मान्यता पावलेला आहे. बलिप्रतिपदेनिमित्त गोवर्धन पूजा करण्याचीही प्रथा-परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णांनी इंद्राच्या महावृष्टीपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून धरला, अशी कथा आहे. श्रीकृष्णांनी हा पर्वत पेलला; पण त्याबरोबरच सर्वसामान्यांनीही हा पर्वत उचलण्यासाठी आपला हातभार लावला होता. सार्वजनिक कार्य म्हणजे जगन्‍नाथाचा रथ, हेच या कथेतून अधोरेखित होते. दीपोत्सवामध्ये सार्वजनिक कार्याचेही अनुशासन केले असावे, याचाही या कथेने वस्तुपाठ घालून दिलेला आहे. दीपोत्सवाचा हा समृद्ध, सांस्कृतिक ठेवा घन अंधारात शुक्राची चांदणी द‍ृष्टीस पडावी, त्याप्रमाणे दिलासा देणारा आहे. संकटे आणि अडचणी यांनी त्रासलेल्या आणि गांजलेल्या सामान्यजनाला उभारी देणारा आहे. जगण्याच्या धडपडीला नवे बळ देणारा आहे. रखरखीत वाळवंटात ओअ‍ॅसिस दिसावे, तसे हा दीपोत्सव मानवी जीवनात हिरवळ फुलविणारा आहे. मानवी जीवनातील डोंगराएवढ्या असलेल्या दु:खावर उतारा म्हणूनच पूर्वसुरींनी अशा मंगलमय सणांची योजना केली असल्यास आश्‍चर्य वाटायचे कारण नाही. नवसंवत्सर नव्या आशा, नव्या आकांक्षा आणि नवी क्षितीजे घेऊन येईल, अशी रास्त अपेक्षा बाळगीत सर्वसामान्य जनता दीपोत्सव साजरा करीत आहे. मागील काही वर्षांतील दु:खद अनुभव बाजूला सारून नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने नवसंवत्सराला सामोरे जात आहे. असत्यावर सत्याने, अधर्मावर धर्माने, अज्ञानावर ज्ञानाने मात करण्याची प्रेरणा देणारा हा दीपोत्सव सर्वांना समृद्धीच्या महामार्गावर नेवो, अशी मनोकामना यानिमित्ताने आम्ही व्यक्‍त करतो. बलिप्रतिपदेदिवशी बहुजन समाजात जी प्रार्थना होते, त्या ‘इडा, पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ या पारंपरिक प्रार्थनेचा पुनरुच्चार करतो. ही प्रार्थना सर्वांच्याच जीवनात यथार्थ ठरावी, अशा मनोमन भावना प्रकट करतो. दीपोत्सवाचा तेजप्रकाश सर्वांच्या जीवनात प्रकट व्हावा, अशा शुभेच्छा व्यक्‍त करतो!

Back to top button