जवानांना हवे तणावमुक्त वातावरण! | पुढारी

जवानांना हवे तणावमुक्त वातावरण!

प्रसाद पाटील, मनोविकार अभ्यासक

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणार्‍या आरोपी चेतन सिंह या आरपीएफ जवानाच्या निमित्ताने अर्धसैनिक दलातील कर्मचार्‍यांमध्ये वाढत चाललेल्या मनोविकारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. देशसेवेसाठी कायम तत्पर असणार्‍या भारतीय जवानांना तणावमुक्त आणि मानसिकद़ृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच तो व त्याचे कुटुंब चांगले जीवन जगू शकतील, असे म्हणावे लागेल.

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये अचानक चार जणांवर गोळीबार करणार्‍या रेल्वे पोलिस दलातील एका आरोपी कॉन्स्टेबलची चौकशी सुरू केली असताना तो मानसिकद़ृष्ट्या असक्षम असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणातील संपूर्ण सत्य अद्याप बाहेर आलेले नाही. मात्र, भारतात सुरक्षा दलात प्रामुख्याने निमलष्करी दलांत मानसिक आजारी असणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे, हे मात्र नक्की. देशसेवेसाठी कायम तत्पर असणार्‍या भारतीय जवानांना तणावमुक्त आणि मानसिकद़ृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच तो व त्याचे कुटुंब चांगले जीवन जगू शकतील, असे म्हणावे लागेल.

कॉन्स्टेबल चेतन सिंह प्रकरणासंदर्भात माध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार सिंह हा मानसिकद़ृष्ट्या आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात 2 ऑगस्ट रोजी निवेदन जारी केले आणि त्यात म्हटले, की सिंहवर वैयक्तिक पातळीवर उपचार सुरू होते आणि त्याची माहिती सुरक्षा दलाला देण्यात आलेली नव्हती. म्हणजेच सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांनी उपचाराची बाब खात्यापासून लपवून ठेवली. मात्र, मंत्रालयाने काही वेळातच आपले निवेदन मागे घेतले आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली असल्याचे सांगितले. म्हणूनच निवेदन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. अर्थात सुरक्षा दलातील कर्मचार्‍यांत निर्माण होणारे मानसिक ताणतणाव हे काही नवीन नाही. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील आकडेवारी जारी केले आहेत.

राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्रालयाने सांगितले, की 2020 या काळात केंद्रीय निमलष्करी दलातील 3 हजार 584 कर्मचार्‍यांवर मानसोपचार सुरू होते. मात्र, 2022 मध्ये ही संख्या वाढून 4 हजार 940 झाली. ही संख्या रुग्णसंख्येतील दोन वर्षांतील 38 टक्के वाढ दर्शवते. या आकडेवारीत सीमा सुरक्षा दल, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्स (एआर) चा समावेश आहे. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या सर्वाधिक लोकांची संख्या सीआरपीएफमध्ये आहे. 2022 मध्ये 4 हजार 940 पैकी 1 हजार 882 रुग्ण हे सीआरपीएफचे आहेत. तसेच बीएसएफमध्ये 1 हजार 327, आसाम रायफल्समध्ये 530, सीआयएसएफमध्ये 472, आयटीबीपीमध्ये 417 आणि एसएसबीतील 312 जणांचा समावेश आहे. गृहमंत्रालयाच्या मते, निमलष्करी दलातील कर्मचार्‍यांची नियमित रूपाने तपासणी, उपचार आणि फॉलोअप घेतला जातोे. गरज भासल्यास चांगल्या रुग्णालयातील तज्ज्ञांकडे पाठविण्यात येते. योगासन करून घेतले जातात आणि स्ट्रेस कौन्सिलिंगही करण्यात येते.

प्रत्येक यूनिटमध्ये पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य अधिकार्‍यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या माध्यमातून अशाप्रकारचे रुग्ण तत्काळ ओळखता येतील आणि उपचारही तातडीने केले जातील. मात्र, आजघडीला सुरक्षा दलात पुरेशा प्रमाणात मानसोपचार तज्ज्ञ नाहीत. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सीआरपीएफमध्ये केवळ तीन, सीमा सुरक्षा दलात चार, एआरमध्ये एक, आयटीबीपीत पाच आणि एसएसबीमध्ये केवळ एकच मानसोपचारतज्ज्ञसंबंधी डॉक्टर आहे. यात सीआयएसएफमध्ये असणार्‍या डॉक्टरांची संख्या नमूद केलेली नाही. मात्र, सर्व सुविधा असतानाही मानसिक आजार, तणावामुळे सातत्याने घटना घडत आहेत.

मंत्रालयाने म्हटले, की 2018 पासून 2022 या काळात सर्व निमलष्करी दलातील एकूण कार्यरत 658 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. यात सीआरपीएफचे 230, बीएसएफचे 174, सीआयएसएफचे 91, एसएसबीचे 65, आयटीबीपीचे 51 आणि आसाम रायफल्सच्या 47 जवानांचा समावेश होता. चेतन सिंह प्रकरण ताजेच आहे आणि सहकार्‍यांवर गोळीबार करण्याचे प्रकार तर सातत्याने घडत असतात. गृहमंत्रालयाने 2022 मध्ये यासंदर्भातील आकडेवारी संसदेत सादर केली असून, त्यानुसार 2017 ते 2022 या काळात अशा घटनांतून 57 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

भारतीय सुरक्षा दलात सातत्याने आत्महत्या आणि सहकार्‍यांवरील हल्ल्याचे प्रकार पाहवयास मिळत आहेत. ही समस्या निमलष्करी दलात आहे आणि लष्करातही आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेेवारीनुसार 2015 पासून 2018 या काळात चार वर्षांत निमलष्करी दलात आत्महत्येचे 410 प्रकार घडले. तसेच 116 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. नौदलात 19 जणांनी, तर हवाई दलात 56 जणांनी आत्महत्या केल्या. त्याचवेळी एका आकडेवारीनुसार, नौदल, हवाई दलात सहकार्‍यांवर गोळीबार केल्याचा एकही प्रकार घडलेला नाही. या घटनेमागे अनेक कारणे असतात.

एक तर खूपच तणावपूर्ण वातावरण असते आणि दीर्घकाळापर्यंत ते कर्तव्यावर तैनात असतात. प्रत्येक वेळी धोका असतो. शिवाय गरजेच्यावेळी सुटी मिळत नाही. या कारणांमुळे मानसिक अस्वस्थता वाढते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी सुरक्षा दलाकडून अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या मते, अनेक ठिकाणी सैन्यांना लहान-सहान गटात विभागले आहे आणि प्रत्येक गटाची जबाबदारी प्रमुख सैनिकांवर आहे. त्याला प्रशिक्षण दिले जाते. तो सर्वांची माहिती घेत असतो. चांगला अधिकारी सैनिकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असतो. मात्र, या प्रकारच्या जबाबदारीत हलगर्जीपणा दाखवला तर अशा घटना सातत्याने घडू लागतात.

Back to top button