इरादों में दम हो तो मंजिले झुका करती हैं। | पुढारी

इरादों में दम हो तो मंजिले झुका करती हैं।

जन्मजात व्यंग असो की, अपघाताने आलेलं अपंगत्व असो, ज्यांच्या पंखांमध्ये जिद्दीचे बळ संचारते त्यांच्या यशाला गवसणी घालण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीला विधाताही रोखू शकत नाही. दोन पाय, एक हात आणि उरलेल्या दुसर्‍या हाताची दोन बोटे अपघातात गमावलेल्या सूरज तिवारी या तरुणाने संपूर्ण जगाला हे दाखवून दिले आहे. रेल्वे अपघातात हात-पाय गमावल्यानंतरही अश्रू न ढाळता हा जिगरबाज जिद्दीला पेटला. अथक 18 तासांचा अभ्यास करून या पठ्ठ्याने ‘आयएएस’ रँक खेचून आणली.

कौन कहता हैं कामयाबी किस्मत तय करती हैं?
इरादों में दम हो तो मंजिले झुका करती हैं।

हा शेर अगदी तंतोतंत लागू व्हावा, अशी अचंबित करणारी कामगिरी केली आहे, मैनपुरीच्या सूरज तिवारी या जिगरबाज तरुणाने. बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर त्याने पुन्हा परीक्षा दिली. यावेळी तो उत्तम गुणांनी पास झाला. विज्ञान विषय घेऊन त्याने बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला; पण 2017 मध्ये एका भयंकर रेल्वे अपघातात त्याचे दोन्ही पाय आणि एक हात असे तीन अवयव कापले गेले. उरलेल्या दुसर्‍या हाताची दोन बोटेही तुटून पडली. आयुष्याच्या वैराण वाळवंटात त्याच्याकडे होती फक्त तीन बोटे. दिल्लीच्या इस्पितळात उपचार घेत असताना त्याला एका विद्यार्थ्याने ‘जेएनयू’ची वाट दाखवली. बरा झाल्यानंतर त्याने ‘आयएएस’ अधिकारी बनायचेच असा चंग बांधला.

याच स्तभांत खुजा नेपोलियन अन् आंधळ्या हेलनने त्यांच्या जन्मजात व्यंगावर मात करून जग जिंकले होते, असा उल्लेख मागील लेखात केला होता. महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन हा ठार बहिरा असूनही त्याने लावलेल्या हजारो शोधांवर संपूर्ण जग चालते आहे, तर पोलिओच्या आघाताने पाय अधू झालेल्या फ्रँकलिन डी. रूझवेल्टला चार वेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यापासून कुणीच रोखू शकले नाही, एवढे ते लढले याचाही उल्लेख याच स्तंभात मागे केला होता. अशा महान प्रेरक विभुती विदेशातच जन्माला येतात असे नव्हे; तर ज्यांचा आदर्श घ्यावा, असे महान सुपुत्र भारतातही जन्माला येतात, हे सूरज तिवारी याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘आयएएस’ बनून दाखवून दिले आहे. नुकत्याच लागलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या निकालात 25 वर्षीय सूरजने ‘यूपीएससी’ परीक्षेत 917 वी रँक पटकावल्याचे जाहीर करण्यात आले अन् त्याच्या आनंदाला उधाण आले. त्यामुळे प्रेरक व्यक्तिमत्त्वे विदेशी माणसांत शोधण्याची गरज नाही. ती आपल्या अवती-भवती आहेत.

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीतील किरावली गावचा सूरज रहिवासी. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची. वडील राजेश तिवारी हे गावातील टेलर. कपडे शिवून ते कसेबसे कुटुंबाची गुजराण करतात. सूरज पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याच्या थोरल्या भावाचा एका अपघातात मृत्यू झाला. पुत्रवियोगाने त्याच्या वडिलांनी अंथरुण धरले. त्यांना इस्पितळात भरती करावे लागले. या संकटातून सूरज बाहेर पडत नाही, तोच त्याचा भयंकर रेल्वे अपघात झाला. त्याने दोन्ही पाय आणि एक हात गमावल्याने तो असहाय्य झाला. ही करुण कहानी त्याने ‘यूपीएससी’ मुलाखत मंडळाला सांगितली. तो सांगतो, “माझे हात-पाय माझ्या शरिरापासून वेगळे झाल्यानंतर माझी जगण्याची ईच्छा संपली होती. मला आत्महत्या करायची होती. परंतु, आत्मघात करण्याचीसुद्धा माझी लायकी नव्हती एवढा असहाय्य मी होतो.”
“जेएनयूमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 500 रुपये अर्थसहाय्य मिळत होते.

मेरीट-कम-मिन्स या योजनेतून दरमहा 2,500 रुपये मिळत असत, तर एस्कॉर्ट भत्ता म्हणून 2,500 रुपये दिले जात. या साडेपाच हजारांत मला कशीबशी गुजराण करावी लागत असे. अनेकदा ‘जेएनयू’च्या होस्टेलची फी मी देऊ शकत नसे. परंतु, अनेक लोकांनी मदत करून ती फी भरली. ‘जेएनयू’चे विद्यार्थी आणि शिक्षक दयाळू आहेत. ‘जेएनयू’ विद्यापीठ हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. मी जो काही घडलो तो ‘जेएनयू’मुळेच!”, हे ऐकताना मुलाखतकारांचे डोळे पाणावले होते, कंठ दाटून आला होता.

सूरजची यशोगाथा जितकी रंजक अन् प्रेरक आहे, तितकीच त्याची जीवन कहानी कारुण्यमय आहे. मुळात एवढे दु:ख कुणाच्या वाट्याला आले असते, तर तो पार मोडून कोसळला असता, आतून ढासळला असता. परंतु, सूरजच्या मनोधैर्याला एका आगळ्यावेगळ्या तेजाची किनार आहे.
‘पंख होने से कुछ नही होता, बुलंद हौसलों की उडाण चाहिए।’ हे सूरज तिवारी याने सिद्ध करून दाखवले आहे.

– देविदास लांजेवार

Back to top button