लवंगी मिरची : भीतीचा थरकाप | पुढारी

लवंगी मिरची : भीतीचा थरकाप

तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना नामक संकटाचे आजही परिणाम जाणवत आहेत. हे बघ मित्रा, ही बातमी वाच. कोरोनाचा कोणता तरी नवीन व्हेरियंट आला आहे, म्हणून सगळ्यांच्या काळजात धडकी भरण्याची वेळ आली आहे.

अरे ते तर आहेच; पण कोरोना काळात ज्याचा अंत्यविधी घरातील लोकांनी केला, असा मध्य प्रदेशातील कमलेश नावाचा युवक दोन वर्षांनंतर घरी परतला. म्हणजे जो गेला असे समजून ज्याच्यावर अंत्यविधी केले तो साक्षात घरी प्रकट झाला, याचा घरच्यांना आनंद नक्कीच झाला असणार; पण हे झाले कसे असेल?

हे बघ, बरेचदा त्या कठीण काळामध्ये जे मृत्यू झाले त्यांच्या शवाला हाताळण्याची परवानगी नव्हती. आरोग्य खाते किंवा महानगरपालिका त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे. म्हणजेच जो गेला त्याचा चेहरा पण कुटुंबीयांना पाहण्यास मिळत नव्हता. म्हणजे कमलेश गेला असे दवाखान्यातील लोकांनी जाहीर केले. त्याची संपूर्ण व्यवस्थित पॅक केलेली बॉडी घरच्यांना सुपूर्द करण्यात आली आणि त्या सर्वांनी ते निळे ड्रेस घालून त्याच्यावर अंत्यविधी केले. साहजिक आहे की, चेहरा न पाहिल्यामुळे ज्याचा अंत्यविधी केला तो भलताच कोणीतरी असावा आणि कमलेश समजून त्याच्याच पार्थिवावर सर्व संस्कार करण्यात आले असावेत, असेच घडले असणार.

संबंधित बातम्या

म्हणजे बघ कमलेशला पोहोचवले, त्याच्या मृत्यूचे दुःख पचवले आणि दैनंदिन कारभार करण्यास त्याच्या कुटुंबाने सुरुवात केली. अर्थात गेलेला माणूस कमलेश नव्हता हे नंतर आज कळाले; पण मग प्रश्न असा उभा राहतो की, गेलेला माणूस कोण होता? त्याच्या कुटुंबीयांचे काय?

अरे, गेलेला माणूस हरवला म्हणून त्याचे कुटुंबीय आजही त्याला शोधत असतील. बरेचदा नाही का आपण वर्तमानपत्रात जाहिराती पाहतो, अमुक अमुक वर्णनाचा मुलगा हरवला आहे किंवा रागारागाने घरातून निघून गेला आहे. कारण, जोपर्यंत बॉडी मिळत नाही तोपर्यंत कायदासुद्धा त्या मृत्यूला मान्यता देत नाही. अशा भीषण गमती-जमती या कोरोनाने आपल्या देशात घडवून आणल्या आणि पुन्हा एकदा तोच काही एका वेगळ्या रूपात धोका बनून समोर उभा राहिला आहे. साहजिकच आहे, नागरिकांच्या काळजामध्ये धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

हो ना यार, आजही तो काळ आठवला की, अंगावर काटा येतो. ठप्प झालेले जनजीवन, वाहतूक, ते रेमडीसिव्हीर इंजेक्शन, ते परस्परांशी संपर्क बंद करून आपापल्या घरात कोंडून घेणे, दवाखान्यात बेड मिळण्याची मारामार, नंतर आलेले लसीकरण. केवढे मोठे संकट येऊन गेले आपल्यावर हे आठवले, तरी भीतीने थरकाप उडतो. कुठल्याही वाहनाचा आवाज नसताना दिवस-रात्र भरधाव वेगाने धावणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्स आणि त्यांचे ते आवाज ऐकून मी आजही कधी-कधी झोपेतून घाबरून उठून बसतो. जीवन आणि मृत्यू यांच्यामधील हा संघर्ष आपण सगळ्यांनी फार जवळून पाहिला आहे.

अर्थात जीवनाची जीत झाली आणि बरेचसे अपवाद वगळता मृत्यूची हार झाली हे निश्चित; पण आजही चुकीच्या माहितीवरून आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आणि तीच व्यक्ती दत्त म्हणून दारात उभी राहिली, तर अशा धक्क्याने पण कुटुंबीयांतील काही लोक दगावतील, अशी भीती वाटते. मी तर एवढेच म्हणेन की, हे करोनाकरा आमच्यावर आता दया करा. कृपा करून पुन्हा आम्हाला दर्शन द्यायला येऊ नका.

– झटका

Back to top button