प्रदूषणाची राजधानी ‘मुंबई’ | पुढारी

प्रदूषणाची राजधानी 'मुंबई'

मुंबईचे शांघाय बनवण्याच्या घोषणा हवेत विरल्या. मुंबईचे लंडन, मुंबईचे सिंगापूर बनवण्याच्या घोषणाही होऊन गेल्या. आता मुंबईला नव्याने जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. अशा घोषणा करणार्‍या राज्यकर्त्यांना तेव्हाही वस्तुस्थितीचे भान नव्हते आणि आजही ते पुरेसे आले आहे, असे म्हणता येत नाही. शांघाय, सिंगापूरची स्वप्ने दाखवण्यापेक्षा जे आहे तेच शहर जगण्यासाठी सुलभ बनवावे, एवढीच नागरिकांची माफक अपेक्षा आहे. परंतु, मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून भव्य स्वप्ने दाखवण्याचा सोस सगळ्याच राज्यकर्त्यांमध्ये दिसतो. त्याचमुळे मुंबई हे प्रदूषणामध्ये देशात पहिल्या आणि जगात दुसर्‍या क्रमांकाचे शहर बनले असतानाही त्याचे भान कुणाला दिसत नाही. देशाची ही आर्थिक राजधानी प्रदूषणाची राजधानी बनली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

नऊ वर्षांपूर्वी एका नामांकित संस्थेने जाहीर केलेल्या ‘लिव्हेबिलिटी इंडेक्स’मध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर होती. नोकरी तसेच व्यवसायाच्या संधी, कुटुंबासह राहण्याच्या सुविधा, उत्तम शिक्षण संस्था, आरोग्याच्या चांगल्या सुविधा आदी विविध निकषांवर आधारित हा क्रम ठरवण्यात आला होता. आता नव्याने पाहणी केली, तर काय आढळेल सांगता येत नाही; परंतु काहीही असले, तरी या शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरतोय, हे मात्र अशा कोणत्याही पाहणीला नाकारता येणार नाही. स्वीस एअर ट्रॅकिंग इंडेक्सच्या (आयक्यूएअर) नव्या सूचीनुसार प्रदूषित शहरांच्या यादीत पाकिस्तानातील लाहोर पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर मुंबई आणि तिसर्‍या क्रमांकावर काबूल आहे. पाकिस्तानातील एका शहरात आपल्यापेक्षा खराब परिस्थिती असल्याचा आनंद कोणी साजरा करत असेल, तर त्याला अर्थ नाही. 29 जानेवारीला सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई शहर दहाव्या क्रमांकावर होते; परंतु अवघ्या आठवड्यात इथली परिस्थिती बदलत गेली आणि 8 फेबु्रवारीला त्याने दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली.

राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणाची चर्चा दरवर्षी हिवाळ्याच्या तोंडावर होत असते. अवघे शहर धुक्यात लपेटले जाते. खरेतर धुक्यात लपेटलेल्या शहराचे हे रोमँटिक चित्र नसते, तर ते धुराने लपेटलेले असते आणि लोक त्यात गुदमरत असतात. वाहनांचा धूर तसेच पंजाबमधील शेतकरी पराली जाळत असल्यामुळे त्याच्या धुराचा परिणाम होतो. दिल्लीच्या या प्रदूषणाची चर्चा नेहमी होत असताना मुंबईने मात्र दिल्लीला मागे टाकून प्रदूषणामध्ये आघाडी घेतली. मुंबईत प्रदूषण होतेच. ते कमी-जास्त असेल; पण या नव्या यादीमुळे त्याचे गांभीर्य समोर आले आहे. मुंबईत राहणार्‍या लोकांच्या आरोग्यापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची जाणीव होण्यास त्यामुळे मदत झाली आहे.

‘मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका’ अशा शब्दांत शाहीर पठ्ठे बापुराव यांनी मुंबईनगरीचे वर्णन केले आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील लोकांना रोजगारासाठी नेहमीच या नगरीने आकर्षित केले. पिढ्या बदलत गेल्या आणि ती तरुणांची स्वप्ननगरी बनली. देशाच्या कानाकोपर्‍यातून लोकांची मुंबईकडे रीघ लागली. स्वप्ननगरी म्हणून कौतुकाचे पूल बांधण्याऐवजी या नगरीतले लोकांचे जगणे कसे सुसह्य होईल, याचा विचार राज्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. मुंबईत अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. या दाव्यामध्ये तथ्य असेल, तर जेव्हा ही विकासकामे पूर्ण होतील तेव्हा प्रदूषणाची तीव—ता कमी होऊ शकेल. परंतु, तशी समजूत काढणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार यावर्षी हिवाळ्यात खराब आणि अत्यंत खराब दिवस गेल्या हिवाळ्याच्या तुलनेत अधिक होते.

प्रदूषणामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आघाडीवर आहे. दुसर्‍या क्रमांकावर देवनार आणि तिसर्‍या क्रमांकावर अंधेरी आहे. बांधकामांबरोबरच डंपिंग ग्राऊंड, रासायनिक कारखाने, बायोमेडिकल वेस्ट ट्रिटमेंट प्लँट हे प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महापालिकेसह शहराचा कैवार घेणार्‍या यंत्रणांनी या प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. कारण, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईच्या प्रदूषणाचे एक प्रमुख कारण म्हणजे इथली वाहनांची प्रचंड संख्या. मुंबईतल्या सर्व रस्त्यांवर सतत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात आणि रस्तोरस्ती सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. कमी प्रदूषण करणारी किंवा अजिबात प्रदूषण न करणारी अत्याधुनिक वाहने बाजारात आली असली, तरी जी जुनी वाहने आहेत ती प्रदूषण वाढवण्यामध्ये आपली भूमिका बजावत असतात.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत असेल, तर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करता येऊ शकते. परंतु, मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तिचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेणार्‍या लोकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर वाढतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होईल. पर्यायाने प्रदूषणही कमी होऊ शकेल. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने या विषयाकडे लक्ष द्यावयास हवे. देशात होणार्‍या आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याचे एका अहवालातून पुढे आले. प्रदूषित हवेमुळे नागरिकांचे आयुर्मानही कमी होत असल्याचा दावा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चसारख्या संस्थांनी केला आहे. याव्यतिरिक्त अचानक होणार्‍या मृत्यूंपैकी तीस टक्के मृत्यूंसाठी वायू प्रदूषण कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. रोजच्या जीवनात जाणवणार्‍या श्वसनाच्या त्रासांपासून ते अचानक येणार्‍या मृत्यूंपर्यंत प्रदूषणाचे धोके लक्षात घेऊन त्यावर उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

Back to top button