काँग्रेस जोडो अन् राज्यपालांना निरोप! | पुढारी

काँग्रेस जोडो अन् राज्यपालांना निरोप!

विवेक गिरधारी

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मिरात पोहोचून बर्फात खेळू लागली तेव्हाच प्रदेश काँग्रेसमधील वातावरण मात्र पार तापलेले होते. कन्याकुमारी ते काश्मीर असा 3,570 किलोमीटरचा प्रवास करताना ही यात्रा महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळवून गेली.
भारत जोडो यात्रेच्या नियोजनात दोन ते तीन गट-तट राहुल गांधींच्या साक्षीने चालत होते. नांदेड जिल्ह्यापुरते तरी सर्व नियोजन मला करू द्या, असा आग्रह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धरला. बाळासाहेब थोरात यांनीही तो मान्य केला. प्रदेशाध्यक्ष नसूनदेखील महाराष्ट्रातील यात्रेची सर्व सूत्रे थोरातांच्या हाती देण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष असूनही नाना पटोले प्रमुख पाहुण्यागत यात्रेत चालले. म्हणजे यात्रेची सारी उस्तवार थोरात आणि चव्हाणांनी केली. प्रसिद्धी मात्र नानांनी घेतली, अशा तक्रारी यात्रेतूनच सुरू झाल्या होत्या.

प्रदेश काँग्रेसमध्ये तशी आधीपासून ठसठस आहे. कुणाचा कुणावर विश्वास नाही. प्रत्येकाला प्रत्येक नेत्याच्या मागे भारतीय जनता पक्ष उभा दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे पटली नाहीत म्हणून खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यापलीकडे पटोले यांचे काय कर्तृत्व आहे? महाराष्ट्रभरातल्या काँग्रेसच्या संस्थानांना एकत्र सांधू शकेल, बांधू शकेल, असा कोणताही धागा पटोलेंच्या मनगटावर नाही. उलट ते भाजपविरोधी राजकारणाचा आव आणतात आणि प्रत्यक्षात राजकारण मात्र भाजपच्या सोयीचे करतात, हा सूर अगदीच चुकीचा ठरवता येत नाही.

भाजपने काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले त्यात महाराष्ट्रदेखील येतो. या स्वप्नाचा थेट अर्थ काँग्रेसचे सर्व स्तरांतून उच्चाटन असा होतो. छोट्या-मोठ्या सर्वच निवडणुकांत काँग्रेसला पराभूत करणे, हा अर्थ फार समजून घ्यावा लागत नाही. दुसरा अर्थ म्हणजे, काँग्रेसला आतून पोखरणे. काँग्रेसवर काँग्रेसमधूनच हल्ले तीव— होतील, अशा खेळी करणे. गोंदियापासून ते नगरच्या संगमनेरपर्यंत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते विधिमंडळ पक्षनेत्यांपर्यंत भाजपने हा दुहीचा खेळ चालवलेला दिसतो. 2021 च्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पटोले यांनी भाजपसाठीच चाली खेळल्या. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात भाजपच्याच छोटू भोयार या तुलनेने छोट्या नेत्याला काँग्रेसमध्ये आणून उभे केले आणि बावनकुळे यांच्या विजयाची निश्चिती केली. आता नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने सुधीर तांबे यांना तिकीट दिले. त्यांनाच ते नको होते. मुलगा सत्यजितसाठी ते आग्रही होते.

अर्ज भरण्यासाठी ते सत्यजितसोबत गेले; पण काँग्रेसचा बी- फॉर्म त्यांनी सरळ बाजूला ठेवून दिला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले सत्यजित तांबे अपक्ष उभे राहिले, तरी त्यांची उमेदवारी काँग्रेसने काही जाहीर केली नाही. सत्यजित जिंकले तेव्हा महाविकास आघाडी आणि भाजपनेही त्यांच्या विजयावर आपला झेंडा फडकावला. तांबे पिता-पुत्र भाजपकडे जाऊ नयेत म्हणून काळजी घेण्याऐवजी त्यांना निलंबित करण्याची भूमिका प्रदेश काँग्रेसने घेतली. सत्यजित विजयी झाल्यानंतर मात्र नाना पटोले यांनी निलंबनाची जबाबदारी थेट दिल्लीवर ढकलली. हा निर्णय श्रेष्ठींचा आहे, तेच काय ते ठरवतील, असे पटोले म्हणतात. सत्यजित हे बाळासाहेब थोरातांचे भाचे असल्यानेच थोरातांना बदनाम करण्याची खेळी पटोले यांनी खेळली. खुद्द बाळासाहेब भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चादेखील त्यांनी सुरू केल्या. अशीच चर्चा ऐन भारत जोडो यात्रेच्या काळात अशोक चव्हाण यांच्याबद्दलही होती. हे सारे राजकारण पाहता, भारत जोडो यात्रेने जे कमावले ते गमावणारे पटोले, थोरातांसारखे नेतेही काँग्रेसमध्ये असल्याने राहुल गांधी यांना आता काँग्रेस जोडो यात्रा हाती घ्यावी लागेल, असे दिसते.

जिल्ह्या-जिल्ह्यांतील काँग्रेसच्या घरंदाज संस्थानांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात एकत्र आणल्याशिवाय भारत जोडोने कमावलेले यश टिकणार नाही. गंमत अशी की, भारत जोडोची सुरुवात जिथून झाली त्या केरळातूनच काँग्रेस जोडोही सुरू करावे लागेल. यात्रा सुरू असतानाच ए. के. अँटोनी यांचे चिरंजीव अनिल के. अँटोनी यांनी काँग्रेस सोडली. काँग्रेसचे प्रवक्ते असलेले जयवीर शेरगील भाजपमध्ये दाखल झाले. राजस्थानात विधानसभा निवडणूक अकरा महिन्यांवर आली असताना सचिन पायलट यांनी आणखी एक यात्रा काढून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आता नामंजूर करण्यात आला असला, तरी त्यांच्या नाराजीनाम्याचे काय? थोरातांचे भाचे सत्यजित तांबे अपक्ष निवडून आले असले, तरी त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपने पायघड्या अंथरून ठेवल्याच आहेत. थोरात येणार असतील तर स्वागत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. काँग्रेसचे असे तयार गड-किल्ले आपल्या तटबंदीत सामावून घेत भाजपची स्वराज्यनिर्मिती मजबूत होते आहे. काँग्रेसच्या विसर्जनात नव्हे, विलीनीकरणात भाजपला अधिक रूची आहे. या विलीनीकरणातून रेडीमेड नेतेही मिळतात आणि त्यांचे बालेकिल्लेही ताब्यात येतात. थोरात आता विलीन होतात की, आपला किल्ला लढवतात, ते आता बघायचे!

राजभवन ते लोकभवन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अखेर घेतला. त्यांच्या पदमुक्त होण्याचे श्रेय मात्र त्यांनी आपल्या विरोधकांना मिळू दिले नाही. मला आता या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी मागच्या महिन्यात केंद्राला पाठवले आणि आता त्यावर निर्णय आला. राज्यपाल म्हणून कोणतेही सुख मला मिळाले नाही, या पदाने दुःखच वाट्याला आले, अशी खंत त्यांनी अलीकडे व्यक्त केली. आपल्या कारकिर्दीत कोश्यारी यांनी अनेक वाद ओढवून घेतले. महाविकास आघाडीशी त्यांचे जमणार नव्हतेच; पण छत्रपती शिवराय, महात्मा फुले या महापुरुषांबद्दल केलेली विधाने त्यांना तशी महागात पडली. मंदिरे उघडा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पाठवलेले पत्र खुद्ध केंद्रानेच मर्यादा भंग करणारे ठरवले; तरीही कोश्यारी महाराष्ट्राला एका चांगल्या कारणासाठी आठवतील.

राजभवन खुले करणारा राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होईल. एखाद्या व्यावसायिक बक्षीस वितरणाला कुठला हॉल मिळत नसेल, तर राजभवन प्रमुख पाहुण्यांसह मिळू लागले ते कोश्यारींच्याच काळापासून. राजभवनावर वेळ घेऊन गेला तो चहापाणी घेतल्याशिवाय कधी परतला नाही. शिवसेनेत बंड होऊन सत्तांतर झाल्यानंतर भाजपायींची राजभवनावरची गर्दी ओसरली, तरी सामन्यांची वर्दळ कायम राहिली. राजभवनाच्या चुल्हीवर चहाचे आधण कायम राहिले. प्रत्येकाचे आगतस्वागत करत राजभवनचे लोकभवन करणारे राज्यपाल म्हणून कोश्यारी लक्षात राहतील.

Back to top button